India vs England 4th T20I : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघानं पाहुण्या इंग्लंडसमोर १८२ धावांचा टार्गेट सेट केले होते. पॉवर प्लेमध्ये इंग्लंडच्या सलामीरांना पॉवर दाखवली. मालिकेत पहिल्यापासून अडखळत खेळणाऱ्या जोडीनं पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. इंग्लंडनं ज्या तोऱ्यात सुरुवात केली ते पाहून पाहुणा संघ पुण्यात टीम इंडियाची बरोबरी करून मुंबईत कांटे की टक्कर देण्याच्या तयारीत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. पहिल्या पाच षटकात इंग्लंडच्या धावफलकावर ५३ धावा लागल्या होत्या.
सगळे प्रयोग झाले; मग शेवटी 'बिन कामाचा स्पिनर' कामी आला इंग्लंडच्या डावातील पहिल्या पाच षटकात पॉवर प्लेचा किंग अर्शदीप सिंग विकेट लेस होता. हार्दिक पांड्याचा वापरही झाला होता. एवढेचं काय इंग्लंडच्या सलामीवीरांची गिरकी घेण्यासाठी वरुण चक्रवर्ती अन् अक्षर पटेलचाही प्रयोग झाला होता. आता यांना विकेट मिळाली नाही तर कुणाला मिळायची? असा प्रश्न निर्माण झाला असताना सूर्यकुमार यादवनं चेंडू रवी बिश्नोईच्या हाती सोपवला. ज्या गोलंदाजांनी मालिकेत जलवा दाखवला ते विकेट लेस राहिल्यावर हा 'बिन कामाचा स्पिनर' काय करणार? असेही अनेकांना वाटले असेल. कारण याआधीच्या प्रत्येक सामन्यात रवी बिश्नोईनं आपल्या चार षटकांचा कोटा तर पूर्ण केला पण त्याच्या खात्यात विकेट फक्त एकच होती. त्यामुळे तो काही कामाचा नाही असं काहीचं चित्र निर्माण झाले होते. पण शेवटी 'बिन कामाचा स्पिनर'च कामी आला.
अन् पठ्ठ्यानं दोन षटकात फिरवली मॅच
रवी बिश्नोईन इंग्लंडच्या डावातील सहाव्या आणि आपल्या पहिल्या षटकातील अखेरच्या चेंडूवर सेट झालेली सलामीची जोडी फोडली. जो लयच मारत होता तो बेन डकेटच त्याच्या जाळ्यात अडकला. सूर्यकुमार यादवनं त्याचा अप्रतिम झेल टिपला. ही विकेट पुण्याच्या मैदानात मोठ्या संख्येनं आलेल्या क्रिकेट प्रेमींसह टेलिव्हिजन अन् मोबाईलवर मॅचचा आनंद घेणाऱ्या चाहत्यांना मोठा दिलासा देणारी होती. एवढ्यावरच रवी बिश्नोई थांबला नाही. त्याने दुसऱ्या षटकात मालिकेत फॉर्ममध्ये असलेल्या जोस बटलरलाही स्वस्तात माघारी धाडले. त्याची ही दोन षटके मॅच फिरवणारी होती.
रवी बिश्नोईची मालिकेतील ही सर्वोच्च कामगिरी
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात रवी बिश्नोईनं ४ षटकात २२ धावा खर्च केल्या. पण त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. दुसऱ्या सामन्यातही हाच सिलसिला कायम दिसला. यावेळी त्याने २७ धावा खर्च केल्या पण ४ षटकांचा कोटा पूर्ण करूनही विकेटचं खातं उघडलं नाही. तिसऱ्या सामन्यात त्याला एक विकेट मिळाली. पण तो सामनाही टीम इंडियानं गमावला अन् त्याने ४ षटकात ४६ धावाही खर्च केल्या. ३ सामन्यात फक्त एक विकेट खात्यात असणाऱ्या या गोलंदाजानं चौथ्या सामन्यात मालिकेतील सर्वोत्तम कामगिरी करताना ४ षटकात २८ धावा खर्च करताना ३ विकेट्स घेतल्या. या कामगिरीसह त्याने सामन्यासह मालिका विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पाहायला मिळाले.