India vs England 3rd Test Live Updates Day 1 : पाटा खेळपट्टी पाहून रोहित शर्माने नाणेफेक जिंकताच लगेच प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, इंग्लंडच्या मार्क वूडने धक्के देताना भारताची अवस्था ३ बाद ३३ अशी केली. रोहित व रवींद्र जडेजा या सिनियर्सनी खांद्यावर जबाबदारी उचलली आणि २०४ धावांची विक्रमी भागीदारी करून मॅच फिरवली. पदार्पणवीर सर्फराज खान ( Sarfaraz Khan) याने मैदान गाजवले होते, परंतु दुर्दैवाने त्याची विकेट पडली.

यशस्वी जैस्वाल ( १०), शुबमन गिल ( ०) व रजत पाटीदार ( ५) हे पहिल्या सत्रात माघारी परतले. रोहित व जडेजा या जोडीने इंग्लंडची डोकेदुखी वाढवली. मार्क वूडने ही जोडी तोडताना १९६ चेंडूंत १४ चौकार व ३ षटकारांसह १३१ धावा करणाऱ्या रोहितला बाद केले. त्यानंतर पदार्पणवीर सर्फराज मैदानावर आला आणि त्याचे वडील व कोच नौशाद खान, पत्नीने टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले. पेव्हेलियनच्या दिशेने जाणाऱ्या रोहितनेही त्याची पाठ थोपटली. सुरुवातीला सावध खेळ करून सेट झालेल्या सर्फराजने हात मोकळे केले. त्याने ४८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि भारताकडून पदार्पणातील संयुक्तपणे ( हार्दिक पांड्या वि. श्रीलंका, २०१७) दुसरे वेगवान अर्धशतक ठरले.
सर्फराज चांगले फटके खेचताना दिसला, परंतु त्याची दुर्दैवी विकेट पडली. ९९ धावांवर खेळणाऱ्या जडेजाने आधी एक धाव घेण्यासाठी त्याला कॉल दिला, परंतु लगेचच त्याला माघारी पाठवले. तोपर्यंत मार्क वूडने चेंडू उचलून यष्टींवर अचूक थ्रो केला. सर्फराज काही काळासाठी स्तब्ध झाला. त्याला ६६ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ६२ धावांवर माघारी जावे लागले. कर्णधार रोहित प्रचंड संतापला आणि त्याने कॅप फेकून नाराजी व्यक्त केली.