अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना रंगला आहे. या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडू हिरव्या रंगाची पट्टी बांधून मैदानात उतरले. याशिवाय पंचांनी आपल्या ड्रेसवर हिरव्या रंगाची पट्टी लावल्याचे दिसून आले. क्रिकेटच्या मैदानात काळी पट्टी बांधून खेळाडू मैदानात उतरल्याचे अनेकदा पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये बहुमूल्य योगदान देणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात उतरतात. पण यावेळी हिरव्या रंगाची पट्टी बांधून खेळाडू मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. यामागचं कारणही एकदम खास आहे. जाणून घेऊयात त्यामागची गोष्ट
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दोन्ही संघातील खेळाडू अन् पंच हिरव्या रंगाची पट्टी बांधून का उतरले मैदानात?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याआधी बीसीसीआयने अवयवदानासंदर्भातील खास उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचा संदेश देण्याच्या हेतूनेच दोन्ही संघातील खेळाडूंसह मैदानातील पंच हिरव्या पट्टीसह मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही संघांनी बीसीसीआयच्या 'अवयव दान करा अन् जीव वाचवा' या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी हिरव्या रंगाच्या पट्ट्या बांधल्या आहेत. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवला जात आहे, अशी माहिती सामन्याआधीच बीसीसीआयने एका निवेदनाच्या माध्यमातून शेअर केली होती.
नाणेफेक होण्याआधी दिसला खास सीन
नाणफेकीच्या आधी दोन्ही संघाचे कर्णधार रोहित शर्मा आणि जोस बटलर यांनी अवयवदान मोहिमेसंदर्भात जनजागृतीचा खास संदेश दिला. टॉसच्या वेळी कर्णधारांसोबत दोन ऑर्गन रिसीव्हरही दिसले. यातील गुंजन उमंग दानी या ज्या फुफ्फुसांच्या रुग्ण आहेत. याशिवाय सुश्री दीप्ती विमल शाह, ज्या मूत्रपिंडाच्या रुग्ण आहेत. बीसीसीआयने दोन्ही कॅप्टन्ससोबतची त्यांचे फोटोही शेअर केले आहेत.