Join us

IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा

पहिल्या षटकात पहिली विकेट मिळाली, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 00:24 IST

Open in App

England vs India, 1st Test Day 2 Stumps : इंग्लंड-भारत यांच्यात लीड्सच्या हेडिंग्लेच्या मैदानात रंगलेल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या संघाने सामन्यात दमदार कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले. तीन शतकवीरांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करुन घेत इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय संघाचा पहिला डाव ४७१ धावांत आटोपला. जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडच्या पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली. झॅक क्रॉउली याच्या रुपात पहिल्याच षटकात टीम इंडियाने यजमानांना धक्का दिला. ओली पोप याचे नाबाद शतक आणिल बेन डकेट याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या दिवसाअखेर ३ विकेट्सच्या मोबदल्यात धावफलकावर २०३ धावा लावल्या आहेत. ओली पोप १३१ चेंडूत १०० धावांवर नाबाद खेळत असून हॅरी ब्रूक १२ चेंडूचा सामना करून शून्यावर नाबाद राहिला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

बुमराह एकटा नडला; तिन्ही फलंदाजांना त्यानेच दाखवला तंबूचा रस्ता

भारतीय संघाला पहिल्या डावात ४७१ धावांवर रोखल्यावर झॅक क्रॉउली आणि बेन डकेट जोडीनं इंग्लंडच्या डावाला सुरुवात केली. पहिल्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने ४ धावांवर क्राउलीला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर बुमराहनने बेन डकेटसह ओली पोपलाही जाळ्यात अडकवले होते. पण क्षेत्ररक्षणावेळी गडबड घोटाळा झाला अन् हो जोडी जमली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी रचत इंग्लंडचा डाव सावला. सेट झालेली ही जोडी फोडण्यासाठीही बुराहलाच गोलंदाजीला यावे लागले. त्याने  बेन डकेटला ६२ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. एवढेच नाही तर जो रुटलाही बुमराहनेच २८ धावांवर चालते केले. अन्य गोलंदाजांना एकही विकेट मिळाली नाही. क्षेत्रक्षकांची साथ लाभली असती तर कदाचित ओली पोपही शतकाआधीच माघारी फिरला असता.

३ चूका अन् दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस फक्त ३ विकेट्स लागल्या हाती

अर्धशतका आधी बेन डकेट इंग्लंडच्या डावातील पाचव्या आणि सातव्या षटकात फसला होता. पण आधी यशस्वी जैस्वाल आणि त्यानंतर रविंद्र जडेजाने त्याचा झेल टिपण्याची संधी गमावली. इंग्लंडच्या डावातील ३१ व्या षटकातील अखेरच्या षटकात बुमराहनं ओली पोपलाही जाळ्यात अडकवले होते. पण यावेळीही यशस्वी जैस्वालच्या हातून झेल सुटला. त्यावेळी तो ६० धावांवर खेळत होता. या संधीच सोनं करत त्याने शतक पूर्ण केले. फिल्डिंग वेळी झालेल्या चुका टाळल्या असत्या तर इंग्लंडच्या संघाची अवस्था नक्कीच बिकट झाली असती. पण दुसरा दिवस गाजवत दोन्ही संघातील कसोटी  सामना अगदी बरोबरीत पोहचला आहे. तिसऱ्या दिवशी हा सामना कुणाच्या बाजूनं झुकणार ते पाहण्याजोगे असेल.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघजसप्रित बुमराहजो रूट