भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात अर्शदीप सिंगनं सलामी जोडीला तंबूचा रस्ता दाखवत जलवा दाखवला. त्यानंतर मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती पिक्चरमध्ये आला. तीन वर्षानंतर टीम इंडियात कमबॅकची संधी मिळाल्यावर सातत्याने तो आपल्या गोलंदाजीतील जादू दाखवून देत आहे. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यातही त्याने आपलं मॅजिक दाखवून दिलं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मिस्ट्री स्पिनरचं मॅजिक; एकाच षटकात दोन विकेट्स
इंग्लंडच्या डावातील आठव्या षटकात सूर्यकुमार यादवनं वरुण चक्रवर्तीच्या हाती चेंडू सोपवला. या षटकात त्याने दोन विकेट घेत इंग्लंडच्या संघाला धक्क्यावर धक्के दिले. टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेआधी प्रमोशन मिळालेल्या हॅरी ब्रूकच्या रुपात वरुण चक्रवर्तीने या सामन्यातील पहिली विकेट आपल्या खात्यात जमा केली. तो १४ चेंडूत २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १७ धावांची भर घालून माघारी फिरला. त्यानंतर वरुण चक्रवर्तीनं लायम लिविंगस्टोन याला शून्यावर माघारी धाडले. जोस बटलरचीही केली शिकार
वरुण चक्रवर्तीनं इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाकडून ४ षटके गोलंदाजी करताना २३ धावा खर्च करून ३ विकेट्स घेतल्या. यात इंग्लंडचा कॅप्टन आणि पाहुण्या संघाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या जोस बटलरचाही समावेश होता. एका बाजूला ठराविक अंतराने विकेट पडत असताना इंग्लंडच्या कर्णधाराने दुसऱ्या बाजूनं संघाच्या डावाला आकार देण्याचे काम केले. तो शेवटपर्यंत खेळण्याच्या मूडमध्ये दिसत होता. पण वरुण चक्रवर्ती आला अन् त्याने त्याचाही खेळ खल्लास केला. जोस बटलरनं इंग्लंडकडून ४४ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ६८ धावा केल्या.
जोस बटलरच्या अर्धशतकाशिवाय दोघांनाच गाठता आला दुहेरी आकडा
इंग्लंडच्या संघांकडून कर्णधार जोस बटलरचं अर्धशतकाशिवाय फक्त हॅरी ब्रूक १७(१४) आणि जोप्रा आर्चर यांना १२ (१०) दुहेरी आकडा गाठता आला. परिणामी पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा डावा निर्धारित २० षटकात सर्व बाद १३२ धावांवर आटोपला.