ND vs ENG, 1st ODI Harshit Rana Create History : कसोटी आणि टी-२० नंतर हर्षित राणाला इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात वनडे पदार्पणाची संधी मिळाली. या संधीचं या युवा गोलंदाजानं सोनं करून दाखवलं आहे. नागपूरच्या मैदानात पदार्पणाचा सामना खेळताना त्याची सुरुवात खराब झाली. पहिल्या षटकात त्याची धुलाई झाली. पण दमदार कमबॅक करत त्याने मोठा डाव साधला आहे. आतापर्यंत कोणत्याही भारतीय गोलंदाजाला जे जमलं नाही ते हार्षित राणानं करून दाखवलं. आधी कसोटी, मग टी-२० आणि आता वनडेतील पदार्पणाच्या सामन्यात त्याने खास छाप सोडत एक नवा विक्रम सेट केलाय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जे कुणाला जमलं नाही ते हर्षित राणानं करून दाखवलं
इंग्लंड विरुद्धच्या नागपूरच्या मैदानातील वनडे सामन्यात हर्षित राणानं ३ विकेट्स घेतल्या. या कामगिरीसह कसोटी आणि टी-२० नंतर वनडेतही त्याने पदार्पणाच्या सामन्यात प्रत्येकी ३-३ विकेट्स घेण्याचा पराक्रम करून दाखवलाय. तिन्ही फॉर्मेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात ३ विकेट्स आपल्या खात्यात जमा करणारा तो भारताचा पहिला गोलंदाज आहे. अशी कामगिरी अन्य कुणालाही जमलेली नाही.
कसोटी, टी-२० आणि वनडे पदार्पणात अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय
हर्षित राणा याने गतवर्षी बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतून कसोटीत पदार्पण केले होते. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात त्याने ४८ धावा खर्च करून ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत बदली खेळाडूच्या रुपात त्याला टी-२० मध्ये पदार्पणाची संधी मिळाली. या सामन्यात त्याने पहिल्या षटकात विकेट घेतली. एवढेच नाही तर या सामन्यातही त्याने तीन विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या होत्या. त्यानंतर आता वनडे पदार्पणातही त्याने ३ विकेट्सचा डाव साधला आहे. इंग्लंडच्या डावातील ३६ व्या षटकात त्याने तिसरी विकेट आपल्या खात्यात जमा करत खास विक्रम सेट केला.
आधी लाजिरवाणा कामगिरी, मग साधला विक्रमी डाव
नागपूरच्या वनडेत हर्षित राणानं मोहम्मद शमीच्या साथीनं भारतीय गोलंदाजीची सुरुवात केली. पहिल्याच षटकात त्याने ११ धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसरं षटकत त्याने निर्धाव टाकले. पण त्यानंतरच्या षटकात त्याने २६ धावा खर्च केल्याचे पाहायला मिळाले. पदार्पणात कोणत्याही भारतीय गोलंदाजाने दिलेल्या या सर्वाधिक धावा आहे. हा लाजिरवाण्या कामगिरीतून सावरताना त्यानंतरच्या षटकात म्हणजे आपल्या वैयक्तिक चौथ्या षटकात हर्षित राणानं दोन विकेट्स घेतल्या. या विकेट्समुळे इंग्लंडचा संघ बॅकफूटवर गेला.