Join us

INDvBAN, U19WCFinal : बांगलादेशच्या ऐतिहासिक विजयात वासीम जाफरचा वाटा, जाणून घ्या कसा

बांगलादेश संघानं आयसीसी 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बलाढ्य भारतीय संघाला नमवून इतिहास घडवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 09:28 IST

Open in App

बांगलादेश संघानं आयसीसी 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बलाढ्य भारतीय संघाला नमवून इतिहास घडवला. तगड्या फलंदाजांची फौज असलेल्या भारतीय संघाला अंतिम सामन्यात 177 धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशनं डकवर्थ लुईस प्रणालीनुसार हा सामना 3 विकेट्स व 23 चेंडू राखून जिंकला. पावसाच्या व्यत्ययामुळे बांगलादेशसमोर 46 षटकांत 170 धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते. ते त्यांनी 42.1 षटकांत 7 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. बांगलादेशचे हे पहिलेवहिले वर्ल्ड कप जेतेपद आहे. त्यामुळे त्यांच्या आनंदासमोर गगन ठेंगणे होते. बांगलादेशच्या या विजयात भारताचा माजी कसोटीपटू वासीम जाफर याचा सिंहाचा वाटा आहे, हे सांगितल्यास तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण, हे खरं आहे आणि त्याचं श्रेय जाफरला द्यायलाच हवं.

अंतिम सामन्यानंतरचा राडा; दोन भारतीय खेळाडूंसह पाच जण दोषी

19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेश संघाची वाटचार सर्वांना अचंबित करणारी ठरली. त्यांनी बलाढ्य प्रतिस्पर्धींनी धुळ चारत अंतिम फेरीत ऐटीत प्रवेश केला. पण, जेतेपदाच्या लढतीत टीम इंडियासमोर त्यांचा टिकाव लागणार नाही, असंच वाटत होतं. भारताच्या यशस्वी जैस्वाल ( 88) आणि तिलक वर्मा ( 38) यांनी दमदार खेळ करताना संघाला शतकी पल्ला गाठून दिला. यशस्वी बाद झाल्यानंतर टीम इंडियाचा डाव गडगडला. 4 बाद 156 धावांवरून टीम इंडियाचा संपूर्ण संघ 177 धावांत तंबूत परतला.

लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या परवेझ होसैन इमोन (47) आणि तनझीद हसन ( 17) यांनी अर्धशतकी सलामी दिली. त्यानंतर त्यांचाही डाव गडगडला. पण, कर्णधार अकबर अलीनं नाबाद 43 धावा करून बांगलादेशला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. 

वासीम जाफरची भूमिका काय?बांगलादेश क्रिकेट मंडळानं ( बीसीबी) गतवर्षी मिरपूर येथील हाय परफॉर्मन्स अकादमीत वासीम जाफर याची फलंदाज प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. या अकादमीत जाफरनं सध्याच्या बांगलादेशच्या 19 वर्षांखालील संघातील अनेक खेळाडूंना मार्गदर्शन केलं होतं. यात कर्णधार अकबर अलीचाही समावेश आहे. अलीसह शाहदार होसैन यानंही जाफरच्या मार्गदर्शनाखाली फलंदाजीचे धडे गिरवले.  

विजयानंतर जाफरनं अलीचं कौतुक केलं. तो म्हणाला,''अकबर अलीनं अंतिम सामन्यात चतुराईनं नेतृत्व केलं. त्यानं बांगलादेशच्या 14 व 16 वर्षांखालील संघाचेही नेतृत्व सांभाळलं आहे. कर्णधार म्हणून त्यानं या मुलांसोबत बराच काळ घालवला आहे. त्यामुळेच त्याच्या खेळात बरीच सुधारणा झाली आहे.''  

टॅग्स :19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कपभारतबांगलादेश