Join us  

India vs Bangladesh : टीम इंडिया दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; पहिला ट्वेंटी-20 सामना अनिश्चिततेच्या सावटाखाली

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेचा पहिला सामना नवी दिल्ली येथे होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 12:28 PM

Open in App

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेचा पहिला सामना नवी दिल्ली येथे होणार आहे. पण, सामन्याला अवघे 4-5 दिवस शिल्लक असताना राष्ट्रीय तपास यंत्रणेनं ( NIA) दिल्ली पोलिसांना सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले आहेत. टीम इंडिया दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याचं पत्र राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळालं आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यावर अनिश्चिततेचं सावट निर्माण झालं आहे. भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात तीन ट्वेंटी-20 आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. 

दक्षिण आफ्रिकेला लोळवल्यानंतर भारतीय संघ दिवाळीच्या सुट्टीवर गेला आहे. आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर टीम इंडिया पुन्हा नव्या आव्हानासाठी सज्ज होणार  आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या मालिकेची सर्वांना उत्सुकता आहे. राजधानीत होणाऱ्या या सामन्यावर दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसे पत्र राष्ट्रीय तपास यंत्रणेनं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे ( बीसीसीआय) पाठवले आहे. तसेच दिल्ली पोलिसांना दोन्ही संघांच्या सुरक्षेत वाढ करण्यासही सांगितले आहे.

या पत्रात असे लिहीले आहे की,''नवी दिल्ली येथील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या  ट्वेंटी-20 सामन्याला कर्णधार विराट कोहली आणि अनेक मुख्य राजकारणी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या सामन्यावर दहशतवादी हल्ला घडवता येईल.'' भारताच्या ट्वेंटी-20 संघातून कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या अनुपस्थितित रोहित शर्मा संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हे पत्र म्हणजे कुणीतही चेष्टा केली आहे. पण, तरीही कोणताही धोका पत्करण्याची राष्ट्रीय तपास यंत्रणेची तयारी नाही. त्यामुळे या सामन्याला येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी करण्यात येईल.  

भारताचा ट्वेंटी-20 संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत ( यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, युजवेंद्र चहल, राहुल चहर, दीपक चहर, खलील अहमद, शिवम दुबे, शार्दूल ठाकूर .

बांगलादेशचा ट्वेंटी-20 संघ - शकिब अल हसन ( कर्णधार), इम्रुल कायेस, लिटन दास, सौम्या सरकार, नैम शेख, मुश्फीकर रहीम, महमुदुल्लाह, अफीफ होसैन, मोसादेक होसैन, अनिमुल इस्लाम, अराफत सन्नी, अल-अमीन होसैन, मुस्ताफिजूर रहमान, सफीऊल इस्लाम.

ट्वेंटी-20 मालिकेचे वेळापत्रक3 नोव्हेंबर - पहिली ट्वेंटी-20,  दिल्ली7 नोव्हेंबर- दुसरी ट्वेंटी-20, राजकोट10 नोव्हेंबर- तिसरी ट्वेंटी-20, नागपूर 

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशदहशतवादी हल्लाबीसीसीआय