Join us

Ind vs Ban, Day Night Test: टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड; 10 वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम 

India vs Bangladesh Day Night Test Match: भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील डे नाइट कसोटीचा दुसरा दिवस गाजवला तो विराट कोहलीनं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 17:47 IST

Open in App

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील डे नाइट कसोटीचा दुसरा दिवस गाजवला तो विराट कोहलीनं. टीम इंडियाच कर्णधार कोहलीनं शतकी खेळी करताना अनेक विक्रमांना गवसणी घातली. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे 27वे शतकं ठरलं. त्याला अजिंक्य रहाणेनं अर्धशतकी खेळी करताना चांगली साथ दिली. पण, कोहली माघारी परतल्यानंतर भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. बांगलादेशच्या गोलंदाजांनी टीम इंडियाच्या तळाच्या फलंदाजांना गुंडाळलं. भारतानं डाव घोषित करून पहिल्या डावात 241 धावांची आघाडी घेतली आहे. या सामन्यात डाव घोषित करून टीम इंडियानं वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली.   इशांत शर्मा ( 5/22), उमेश यादव ( 3/29) आणि मोहम्मद शमी ( 2/36) यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघानं बांगलादेशचा पहिला डाव 106 धावांत गुंडाळला. बांगलादेशकडून शदमन इस्लाम ( 29) आणि लिटन दास ( 24) यांनी चांगला खेळ केला. त्यानंतर भारताच्या सलामीवीरांना अपयश आलं. मयांक अग्रवाल ( 14) आणि रोहित शर्मा ( 21) छोटेखानी खेळी केली. पण, पुजारा व विराटनं संघाचा डाव सावरला. दोघांनी वैयक्तिक अर्धशतकी खेळी करताना भारताला आघाडी मिळवून दिली. पुजाराला इबादत होसैननं माघारी पाठवलं. अजिंक्य रहाणेनं 69 चेंडूंत 7 चौकार मारताना 51 धावा केल्या. 

त्यानंतर विराटनं शतक पूर्ण केलं. विराटच्या या खेळीच्या जोरावर भारतानं दोनशे धावांची आघाडी घेतली. कोहलीनं 194 चेंडूंत 18 चौकारांसह 136 धावा केल्या. ही खेळी डे नाइट कसोटीतील सर्वोत्तम खेळी ठरली. विराटनं दिवस रात्र कसोटीत शतक झळकावणाऱ्या पहिल्या भारतीय फलंदाजाचा मान पटकावला. कर्णधार म्हणून विराट कोहलीचं हे 41वं आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. या कामगिरीसह त्यानं ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रिकी पाँटिंग याच्या विक्रमाशी बरोबरी केली. विराटनं 188 डावांत 41 शतकं झळकावली, तर पाँटिंगला हा पल्ला गाठण्यासाठी 376 डाव खेळावे लागले. दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ 368 डावांत 33 शतकांसह तिसऱ्या स्थानी आहे. 

कोहली माघारी परतल्यानंतर भारताचे तळाचे फलंदाज झटपट माघारी परतले. बांगलादेशच्या गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले. भारताचे 5 फलंदाज 58 धावांत माघारी परतले. भारतानं 9 बाद 347 धावांवर डाव घोषित केला. टीम इंडियानं सलग सात सामन्यांत प्रतिस्पर्धी संघावर डाव घोषित केला. कसोटी क्रिकेटमध्ये हा एक विक्रम आहे. 2009मध्ये इंग्लंडने अँण्ड्य्रू स्ट्रॉसच्या नेतृत्वाखाली सलग 6 सामन्यांत डाव घोषित केला होता.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशविराट कोहलीअजिंक्य रहाणेचेतेश्वर पुजारा