भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेतील तिसरा व अंतिम सामना आज नागपूर येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने दुसरा सामना जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका विजयाचा टीम इंडियाचा निर्धार आहे. त्याचवेळी बांगलादेशनेही ऐतिहासिक मालिका जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे दोन्ही संघ नागपूर सामन्यात संपूर्ण ताकदीनं उतरतील हे निश्चित. या सामन्यात बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय केला. या सामन्यात दोन्ही संघांनी आपापल्या चमूत प्रत्येकी एक-एक बदल केला आहे.
बांगलादेशनं मोसाड्डेकला बाहेर बसवून मोहम्मद मिथूनला स्थान दिले, तर टीम इंडियानं कृणाल पांड्याच्या जागी संघात मनीष पांडेला खेळवले आहे. या सामन्यात भारतीय संघ एक अतिरिक्त फलंदाजासह मैदानावर उतरणार आहे. भारतीय संघ आता
रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, खलिल अहमद आणि युजवेंद्र चहल ही फळी घेऊन मैदानावर उतरणार आहे. त्यामुळे शिवम हा चौथ्या गोलंदाजाची भूमिका बजावणार आहे.
रोहितनं सांगितलं,''आम्हालाही प्रथम गोलंदाजी करायला आवडलं असतं. प्रथम फलंदाजी करणारा संघ लक्ष्य ठवतो आणि त्याचा पाठलाग करणं सोपं असतं. कारण, दुसऱ्या डावात खेळपट्टी संथ होते. आशा करतो की आम्ही समाधानकारक लक्ष्य उभारण्यास यशस्वी होवू..''
भारतीय संघातील या बदलावर समालोचक हर्षा भोगले यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले,'' कृणाल पांड्याला बसवून भारतीय संघानं गोलंदाजीचे पर्याय कमी केले आहेत. सध्याच्या संघात शिवम दुबे हा चौथा गोलंदाज असेल. श्रेयस गोलंदाजी करू शकतो. पण, हा खूप मोठा निर्णय आहे आणि तो धोकादायक ठरू शकतो.''