भारत विरुद्ध बांगलादेश ट्वेंटी-20 मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी राजकोट येथे खेळवण्यात येणार आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. आघाडीच्या फलंदाजांचे अपयश, DRSचा निर्णय घेण्यात झालेल्या चुका, मोक्याच्या क्षणी सोडलेला झेल अन् अनुभवाची कमतरता असलेले गोलंदाज यामुळे टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. बांगलादेशनं 7 विकेट्स राखून ऐतिहासिक विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या पराभवानंतर पुन्हा मालिकेत कमबॅक करण्याचा निर्धार टीम इंडियानं केला आहे. त्यामुळे राजकोट येथे होणाऱ्या सामन्यात रोहितनं बदलाचे संकेत दिले आहेत.
या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला,''आमच्याकडे फलंदाजांची फळी चांगली आहे. त्यामुळे त्या विभागात काही बदल करण्याची गरज मला वाटत नाही. पण, खेळपट्टीचा अभ्यास केल्यानंतर अंतिम अकरामध्ये काही बदल नक्की होतील. पहिल्या सामन्यात आम्ही ज्या मध्यमगती गोलंदाजांसह खेळलो, तो खेळपट्टीचा अंदाज घेऊनच निर्णय घेतला होता. त्यामुळे राजकोट येथील खेळपट्टी पाहिली जाईल आणि त्यानंतर गोलंदाजी बदल केला जाईल.''
राजकोट येथील खेळपट्टी ही दिल्लीपेक्षा चांगली असेल, अशी अपेक्षा रोहितनं व्यक्त केली आहे. तो म्हणाला,''राजकोटची खेळपट्टी सध्या चांगली दिसत आहे. येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी नेहमीच नंदनवन ठरली आहे आणि गोलंदाजांनाही मदत करणारी आहे. ही खेळपट्टी नवी दिल्लीपेक्षा चांगली असेल.''