भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात चांगल्या सुरुवातीनंतर बांगलादेशला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. युजवेंद्र चहलनं एकाच षटकात बांगलादेशच्या महत्त्वाच्या फलंदाजांना माघारी पाठवले. लिटन दास, सौम्या सरकार, मोहम्मद नईम आणि महमदुल्लाह यांनी उपयुक्त खेळी केली. पण, भारतीय गोलंदाजांनी त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.
या सामन्यात रिषभ पंतकडून अजानतेपणानं चूक घडली आणि ती भारतासाठी डोकेदुखी ठरली. नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्मानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण, बांगलादेशच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात करून भारताच्या चमून चिंतेचं वातावरण निर्माण केलं. बांगलादेशनं पहिल्या पॉवर प्ले मध्ये एकही विकेट न गमावता 54 धावा केल्या. सहाव्या षटकात भारताला यश मिळालं होतं, परंतु यष्टिरक्षक रिषभ पंतची एक चूक महागात पडली.
सहाव्या षटकात रोहितनं चेंडू फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या हाती सोपवला. त्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रिषभनं स्टम्पिंग करताना लिटन दासला माघारी पाठवले. पण, तिसऱ्या पंचांनं रिषभची एक चूक पकडली अन् बांगलादेशच्या फलंदाजाला जीवदान मिळालं. पंतनं चेंडू स्टम्पच्या पुढे पकडून स्टम्पिंग केली आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांनी नो बॉल देत लिटन दासला नाबाद ठरवलं. त्यानंतर सातव्या षटकात रोहितनं लिटनचाच झेल सोडला. पण, त्यानंतर पंतनेच टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. पंतनं लिटन दासला धावबाद करून माघारी पाठवले. लिटनने 21 चेंडूंत 4 चौकारांसह 29 धावा केल्या. बांगलादेशनं 10 षटकांत 1 बाद 78 धावा केल्या.
वॉशिंग्टन सूंदरनं भारताला दुसरे यश मिळवून दिले. त्यानं मोहम्मद नईमला श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले. नईमने 31 चेंडूंत 5 चौकारांसह 36 धावा केल्या. त्यानंतर चहलने 13व्या षटकात बांगलादेशच्या दोन प्रमुख फलंदाजांना माघारी पाठवले. मुश्फिकर रहिम ( 4) आणि सौम्या सरकार ( 30) एकाच षटकात बाद झाले. 13व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पंतनं सरकारला यष्टिचीत केले. पण, तिसऱ्या पंचांनी रिप्ले पाहिला आणि सुरुवातीला नाबाद असा निर्णय दिला. पण, त्यांना ही चूक लक्षात येताच त्यांनी निर्णय मागे घेत सरकारला बाद दिले. त्यानंतर महमदुल्लाहनं 21 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीनं 30 धावा केल्या. दीपक चहरनं त्याला बाद केलं. बांगलादेशला 6 बाद 153 धावा करता आल्या.