भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात रिषभ पंतकडून अजानतेपणानं चूक घडली आणि ती भारतासाठी डोकेदुखी ठरली. नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्मानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण, बांगलादेशच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात करून भारताच्या चमून चिंतेचं वातावरण निर्माण केलं. बांगलादेशनं पहिल्या पॉवर प्ले मध्ये एकही विकेट न गमावता 54 धावा केल्या. त्यानंतर बांगलादेशचे तीन फलंदाज माघारी परतले.
सहाव्या षटकात रोहितनं चेंडू फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या हाती सोपवला. त्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रिषभनं स्टम्पिंग करताना लिटन दासला माघारी पाठवले. पण, तिसऱ्या पंचांनं रिषभची एक चूक पकडली अन् बांगलादेशच्या फलंदाजाला जीवदान मिळालं. पंतनं चेंडू स्टम्पच्या पुढे पकडून स्टम्पिंग केली आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांनी नो बॉल देत लिटन दासला नाबाद ठरवलं. त्यानंतर सातव्या षटकात रोहितनं लिटनचाच झेल सोडला. पण, त्यानंतर पंतनेच टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. पंतनं लिटन दासला धावबाद करून माघारी पाठवले. लिटनने 21 चेंडूंत 4 चौकारांसह 29 धावा केल्या. बांगलादेशनं 10 षटकांत 1 बाद 78 धावा केल्या.
वॉशिंग्टन सूंदरनं भारताला दुसरे यश मिळवून दिले. त्यानं मोहम्मद नईमला श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले. नईमने 31 चेंडूंत 5 चौकारांसह 36 धावा केल्या. बाराव्या षटकात कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर मुश्फिकर रहीमनं पॅडल स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडू आणि बॅटचा योग्य संपर्क झाला नाही. पण, तरीही पंत तो चेंडू हवेत शोधत राहिला आणि स्टेडियमवर एकच हास्यकल्लोळ झाला.