इंदूर : वेगवान गोलंदाजांच्या आणखी एका दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने बांगलादेशचा पहिल्या कसोटी सामन्यात शनिवारी येथे तिसऱ्या दिवशी एक डाव १३० धावांनी पराभव केला. यासह दोन सामन्याच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली.
भारताने सकाळी आपला पहिला डाव ६ बाद ४९३ धावसंख्येवर घोषित करीत ३४३ धावांची मोठी आघाडी घेतली होती. पहिल्या डावात केवळ १५० धावा करणाऱ्या बांगलादेशच्या फलंदाजांना दुसऱ्या डावातही विशेष योगदान देता आले नाही. त्यांचा दुसरा डाव २१३ धावात संपुष्टात आला. आता उभय संघांदरम्यान २२ नोव्हेंबरपासून कोलकातामध्ये दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. ही लढत गुलाबी चेंडूने खेळली जाईल. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असून या शानदार विजयासह भारताने ६० गुणांची कमाई केली. यासह भारताच्या खात्यावर एकूण ३०० गुणांची नोंद असून भारतीय संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान आणखी भक्कम केले आहे.
भारताच्या विजयाचे शिल्पकार वेगवान गोलंदाज आणि सलामीवीर फलंदाज मयांक अगरवाल ठरले. मयांकने २४३ धावांची शानदार खेळी केली. त्यासाठी त्याची सामनावीर पुरस्कारासाठी निवड झाली. पहिल्या डावात तीन बळी घेणाºया मोहम्मद शमीने दुसºया डावात ३१ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. उमेश यादव (२/५१) आणि इशांत र्श्मा (१/३१) यांची त्याला योग्य साथ लाभली. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन (३/४२) याचेही योगदान उल्लेखनीय ठरले. भारताचा बांगलादेशविरुद्ध हा १० सामन्यांतील आठवा विजय आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने १० व्यांदा डावाच्या अंतराने विजय मिळवला असून हा भारतीय विक्रम आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ९ सामन्यांच्या डावाच्या फरकाने विजय मिळवले होते.
बांगलादेशतर्फे दुसºया डावात केवळ अनुभव मुशफिकूर रहीमने काही अंशी संघर्ष केला. त्याने सुरुवातीला मिळालेल्या जीवदानानंतर १५० चेंडूंत ६४ धावा केल्या. मुशफिकुरने लिट्टन दास (३५) याच्यासोबत सहाव्या विकेटसाठी ६३ धावा आणि मेहदी हसन मिराजसोबत (३८) सातव्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली.
बांगलादेशच्या दुसºया डावाची सुरुवात निराशाजनक झाली. उमेशने शानदार आऊट स्विंगरवर इमरुल कायेस (६) याचा त्रिफळा उडवला. कायेस सुरुवातीपासून संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसले. उमेशने लवकरच त्याची डावी यष्टी उडवली. युवा शादमन इस्लामला (६) इशांतने आपला वेग व स्विंग माºयामुळे त्रस्त केले आणि त्याच्या एका चेंडूवर तो क्लीनबोल्ड झाला. बांगलादेशची आशा मोमिनुल हकवर (७) होती, पण तो सुरुवातीपासून दडपणाखाली दिसला. उमेशच्या उजव्या यष्टिबाहेर जाणाºया चेंडूवर त्याच्याविरुद्ध पायचितसाठी डीआरएस घेण्यात आले, पण त्याचा निर्णय मोमिनुलच्या बाजूने लागला. शमीच्या चेंडूवर तो पायचित बाद होता, पण त्यासाठी कर्णधार कोहलीला डीआरएसचा आधार घ्यावा लागला आणि यावेळी निर्णय भारताच्या बाजूने लागला.
शमीने त्यानंतर मोहम्मद मिथुन (१८) याला आखूड टप्प्याच्या चेंडूवर तंबूचा मार्ग दाखविला. मुशफिकूर उपाहारापूर्वी तंबूत परतला असता पण शमीच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने त्याचा दुसºया स्लिपमध्ये सोपा झेल सोडला. भारताला दुसºया सत्रात महमुदुल्लाह (१५) व लिट्टन दास यांना बाद करण्यात यश आले. शमीने महमदुल्लाहला बाद करीत आपला तिसरा बळी घेतला. रोहितने यावेळी झेल टिपण्यात कुठली चुक केली नाही. लिट्टन व मुशफिकुर यानी उपाहारानंतर फिरकीपटूंविरुद्ध चांगला खेळ केला.
लिट्टनला संयम राखला आला नाही आणि अश्विनच्या गोलंदाजीवर तो त्याच्याकडे झेल देत माघारी परतला. अश्विनचा कसोटी कारकिर्दीतील हा ३६० बा बळी ठरला. त्यानंतर मेहदीने आक्रमक खेळी करण्याची रणनीती अवलंबली, पण उमेशने चहापानानंतरच्या पहिल्याच षटकात त्याला त्रिफळाचीत केले. ताईजुल इस्लामला शमीने माघारी परतवले. मुशफिकूरची संघर्षपूण खेळी अश्विनने संपुष्टात आणली. त्यानंतर अश्विनने इबादत हुसेनला (१) बाद करीत बांगलादेशचा दुसरा डाव संपुष्टात आणला. (वृत्तसंस्था)
धावफलक
बांगलादेश (पहिला डाव) : ५८.३ षटकांत सर्वबाद १५०.
भारत (पहिला डाव) : ११४ षटकांत ६ बाद ४९३ (डाव घोषित).
बांगलादेश (दुसरा डाव) : शादमान इस्लाम त्रि. गो. इशांत ६, इमरुल कायेस त्रि. गो. उमेश ६, मोमिनुल हक पायचित गो. शमी ७, मोहम्मद मिथुन झे. अग्रवाल गो. शमी १८, मुशफिकुर रहीम झे. पुजारा गो. अश्विन ६४, महमुदुल्लाह झे. रोहित गो. शमी १५, लिट्टन दास झे. व गो. अश्विन ३५, मेहदी हसन मिराज त्रि. गो. उमेश ३८, ताइजुल इस्लाम झे. साहा गो. शमी ६, अबू जायेद नाबाद ४, इबादत हुसेन झे. उमेश गोय अश्विन १, अवांतर (१३). एकूण ६९.२ षटकांत सर्वबाद २१३ धावा.
बाद क्रम : १-१०, २-१६, ३-३७, ४-४४, ५-७२, ६-१३५, ७-१९४, ८-२०८, ९-२०८, १०-२१३.
गोलंदाजी : इशांत शर्मा ११-३-३१-१, उमेश यादव १४-१-५१-२, मोहम्मद शमी १६-७-३१-४, रवींद्र जडेजा १४-२-४७-०, रविचंद्रन अश्विन १४.२-६-४२-३.
आकडेवारी
सलग तीन कसोटी सामने एक डाव आणि १०० हून अधिक धावांनी जिंकणारे संघ :
ऑस्ट्रेलिया (१९३०-३१)
वि.वि. वेस्ट इंडिज, एक डाव
आणि १७२ धावा (सिडनी).
वि.वि. वेस्ट इंडिज, एक डाव आणि २१७ धावा (ब्रिस्बेन).
वि.वि. वेस्ट इंडिज, एक डाव आणि १२२ धावा (मेलबोर्न)
पाकिस्तान (२००१-०२)
वि.वि. बांगलादेश, एक डाव आणि २६४ धावा (मुलतान).
वि.वि. बांगलादेश, एक डाव आणि १७८ धावा (ढाका).
वि.वि. बांगलादेश, एक डाव
आणि १६९ धावा (चितगाव)
भारत (२०१९-२०)
वि.वि. द. आफ्रिका, एक डाव आणि १३७ धावा (पुणे).
वि.वि. द. आफ्रिका, एक डाव आणि २०२ धावा (रांची).
वि.वि. बांगलादेश, एक डाव
आणि १३० धावा (इंदूर).
प्रतिस्पर्धी संघाच्या एकूण धावसंख्येहून जास्त धावांची
खेळी करणारे भारतीय फलंदाज :
विनू मंकड (२३१) वि. न्यूझीलंड (२०९, २१९) चेन्नई १९५५-५६.
राहुल द्रविड (२७०) वि. पाकिस्तान (२२४, २४५) रावळपिंडी २००३-०४.
सचिन तेंडुलकर (२४८) वि. बांगलादेश (१८४, २०२) ढाका २००४-०५.
विराट कोहली (२१३) वि. श्रीलंका (२०५, १६६) नागपूर २०१७-१८.
रोहित शर्मा (२१२) वि. द. आफ्रिका (रांची) २०१९-२०.
मयांक अगरवाल (२४३) वि. बांगलादेश (१५०, २१३) इंदूर २०१९-२०.
भारतीय संघाने सलग सहावा कसोटी सामना जिंकताना दुसऱ्यांदा अशी कामगिरी केली.
याआधी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०१३ साली सलग सहा कसोटी सामने जिंकण्याची कामगिरी होती.
इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारतीय संघाने सलग आठवा आंतरराष्ट्रीय विजय मिळविण्याची कामगिरी केली.
बांगलादेश संंघाचा परदेशातील सलग सहावा पराभव ठरला. यातील पाच पराभव एक डाव राखून पत्करलेला आहे.