भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियानं गुरुवारी क्रिकेट संघ जाहीर केला. विल पुकोव्हस्की आणि कॅमेरून ग्रीन या फलंदाजांसह फिरकीपटू मिचेल स्वेप्सन आणि दोन जलदगती गोलंदाजांची संघात निवड करण्यात आली आहे. या जलदगती गोलंदाजांपैकी एकाच्या नावाभवती नकोशी बातमी घुटमळत आहे. २०१४मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी सर्वात दुःखद घटना घडली. ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा उगवता तारा म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या फिल ह्यूजने २७ नोव्हेंबरला अखेरचा श्वास घेतला. शेफील्ड शील्ड स्पर्धेत सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर फलंदाजी करत असलेल्या २५ वर्षीय ह्यूजेसच्या मानेच्या जवळ चेंडू लागला आणि तो जमिनीवर कोसळला. त्यानंतर तीन दिवसानंतर ह्युजेसनं अखेरचा श्वास घेतला. ज्याच्या गोलंदाजीवर ह्युजेस जखली झाला त्याच गोलंदाजाला क्रिकेट ऑस्ट्रेलिया टीम इंडियाविरुद्ध कसोटी मालिकेत मैदानावर उतरवणार आहे.
तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेनंतर चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. १७ ते २१ डिसेंबरला अॅडलेड ओव्हल येथे डे नाईट कसोटी होणार आहे. त्यानंतर २६ ते ३० डिसेंबर (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड), ७-११ जानेवारी २०२१ (सिडनी क्रिकेट ग्राऊंड) आणि १५-१९ जानेवारी २०२१ ( ब्रिस्बेन क्रिकेट ग्राऊंड) अशा कसोटी होणार आहे. त्यात अनुष्का शर्माच्या बाळंतपणासाठी विराट कोहली ( Virat Kohli) पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे. त्यामुळे टीम इंडियाची उर्वरित कसोटी सामन्यांत कस लागणार हे नक्की आहे. त्यात ऑस्ट्रेलियानं कसोटी संघात मिचेल नेसर व सीन अबॉट या जलदगती गोलंदाजांचा समावेश केल्यानं टीम इंडियाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
सीन अबॉटच्या गोलंदाजीवर सहा वर्षांपूर्वी २५ वर्षीय ह्युजेसला दुखापत झाली होती आणि त्यानं टाकलेला चेंडू मानेच्या जवळ जोरात आदळला होता. ह्युजेसला त्वरित हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. कोमात गेलेल्या ह्युजेसला हॉस्पिटलमध्ये अबॉट भेटायलाही गेला होता, परंतु तीन दिवसांनंतर ह्युजेसचे निधन झाले. या घटनेचा अबॉटने चांगलाच धक्का घेतला होता. तो डिप्रेशनमध्ये गेला होता. संघसहकारी, कुटुंबीय आणि मित्रांच्या मदतीने तो डिप्रेशनमधून बाहेर आला. या घटनेतून तो सावरला असून त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ डेव्हिड वॉर्नर, जो बर्न्स, विल पुकोव्हस्की, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू वेड, टीम पेन ( कर्णधार व यष्टिरक्षक), कॅमेरून ग्रीन, सीन अबॉट, मिचेल नेसेर, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, जेम्स पॅटिन्सन, नॅथन लियॉन, मिचे स्वेप्सन.