सिडनी : ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध आजपासून सुरू होत असलेल्या तीन दिवसांच्या सराव सामन्याद्वारे भारतीय संघ कसोटी मालिकेची तयारी करणार आहे. या दौऱ्यात भारतासाठी दोन सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या लढतीद्वारे फलंदाजी आणि गोलंदाजीत योग्य संतुलन साधण्याची भारताकडे संधी असेल. कसोटी मालिकेचा प्रारंभ सिडनीत १७ डिसेंबरपासून दिवसरात्र लढतीद्वारे होणार आहे.
मयांक अग्रवाल डावाला सुरुवात करणार असून त्याच्या सोबतीला पृथ्वी शॉ की शुभमान गिल यांच्यापैकी कुणाला खेळवायचे, याचा निर्णय व्हायचा आहे. न्यूझीलंड दौऱ्यात शाॅ ला संधी देण्यात आली होती. आयपीएलमध्ये मात्र तो फॉर्ममध्ये नव्हता. गिलने ४४० धावा केल्या होत्या. लोकेश राहुल हादेखील चांगला पर्याय आहे. यष्टिरक्षणात रिद्धिमान साहा आणि ऋषभ पंत यापैकी एकाला संधी दिली जाईल.
पहिल्या कसोटीनंतर कोहली मायदेशी परतणार असून रोहित शर्माच्या खेळण्याविषयी शंका आहे. अशावेळी अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि अनुमा विहारी यांच्यावर भिस्त असेल.
गोलंदाजीज जसप्रीत बुमराह कसोटीच्या सरावासाठी हा सामना खेळू शकतो. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि ४६ कसोटींचा अनुभव असलेला उमेश यादव हेदेखील हात आजमावू शकतात. रवींद्र जडेजाच्या अनुपस्थितीत रविचंद्रन अश्विनच्या सोबतला कुलदीप यादव असेल.
ऑस्ट्रेलियाकडे डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीत युवा विलियम पुकोव्हस्की याला स्थान दिले जाईल. सराव सामन्यात चांगला खेळ करणाऱ्यांनाच कसोटी संघात स्थान मिळेल, असे कोच जस्टिन लँगर यांनी आधी स्पष्ट केले आहे. पहिला सराव सामना लाल चेंडूने आणि ११ डिसेंबरपासून होणारा दुसरा सामना गुलाबी चेंडूने खेळविण्यात येणार आहे.