Join us  

के. एल. राहुल, पांड्याच्या जागी विजय शंकर, शुभमन गिलला संधी

ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी नवोदित खेळाडूंची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 10:20 AM

Open in App

मुंबई: कॉफी विथ करण कार्यक्रमातील वादग्रस्त विधानांमुळे निलंबित करण्यात आलेल्या क्रिकेटपटू के. एल. राहुल आणि हार्दिक पांड्या यांच्या जागी टीम इंडियात विजय शंकर आणि शुभमन गिल यांना संधी देण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दौऱ्यासाठी विजय शंकरची निवड करण्यात आली आहे. तर त्यापुढील न्यूझीलंड दौऱ्यासाठी शुभमन गिलची वर्णी लागली आहे. ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिकेनंतर टीम इंडिया न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय शंकरला संधी मिळण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंड दौऱ्यासाठीही त्याची संघात निवड करण्यात आली आहे. तर न्यूझीलंडमधील एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिकेनंतर न्यूझीलंडला जाईल. तिथे 23 जानेवारीपासून पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल. विजय शंकर आतापर्यंत भारतीय संघाकडून पाच टी-20 सामने खेळला आहे. त्यात त्यानं तीन फलंदाजांना बाद केलं आहे. याशिवाय तो 41 प्रथमश्रेणी सामने खेळला आहे. त्याच्या नावावर 1630 धावा आणि 32 विकेट्स जमा आहेत. तर शुभमन गिलनं 2018 मध्ये झालेल्या अंडर 19 वर्ल्डकपमध्ये चमकदार कामगिरी केली होती. तो न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून भारतीय संघात पदार्पण करेल. 2018 मध्ये शुभमन गिल कोलकात्याच्या संघाकडून आयपीएल खेळला होता. त्यात त्यानं चांगली कामगिरी केली होती. शुभमन पंजाबकडून प्रथमश्रेणी सामने खेळला आहे. 2018-19 च्या रणजी स्पर्धेत त्यानं तामिळनाडूच्या संघाविरुद्ध 268 धावांची शानदार खेळी साकारली होती. या स्पर्धेत त्यानं पाच सामन्यात तब्बल 728 धावा फटकावल्या. त्यात दोन शतकं आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे.  

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआॅस्ट्रेलियाहार्दिक पांड्या