Join us

India vs Australia : निर्णायक सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का, प्रमुख खेळाडू जायबंद

India vs Australia : चौथ्या वन डे सामन्यात धमाकेदार कामगिरी करून विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 15:40 IST

Open in App

मोहाली, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : चौथ्या वन डे सामन्यात धमाकेदार कामगिरी करून विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली. भारताने विजयासाठी ठेवलेले 359 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 4  विकेट्स व 13 चेंडू राखून सहज पार केले. त्यामुळे बुधवारी नवी दिल्ली येथे होणाऱ्या सामना मालिका विजयासाठी निर्णायक बनला आहे. मात्र, मोहालीतील ऐतिहासिक विजयानंतर मनोबल उंचावलेल्या ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा प्रमुख खेळाडू मार्कस स्टॉयनिस हा या सामन्याला मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिखर धवनच्या 143 धावांची खेळी आणि रोहित शर्माची ( 95) त्याला मिळालेली साथ, याच्या जोरावर भारताने 358 धावांचा डोंगर उभा केला 350हून अधिक धावांचा डोंगर उभा करून भारताला विजय आपलाच असे वाटले होते, परंतु ऑस्ट्रेलियाने त्यांना पराभवाची चव चाखवली. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे दोन फलंदाज अवघ्या 12 धावांवर माघारी परतले होते. मात्र, उस्मान ख्वाजा आणि पीटर हँड्सकोम्ब यांनी विक्रमी 192 धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला विजयाचा मार्ग दाखवला. त्यानंतर अ‍ॅस्टन टर्नरने जोरदार फटकेबाजी करून ऑस्ट्रेलियाचा विजय पक्का केला. टर्नरने 43 चेंडूंत 84 धावांची वादळी खेळी केली. त्याच्या या खेळीत 5 खणखणीत षटकारांसह 6 चौकारांचा समावेश होता.सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत स्टॉयनिसच्या समावेशाबाबत शतकवीर पीटर हँड्सकोम्बनं सांगितले की,''तो पाचव्या सामन्यात खेळू शकेल असे वाटले होते, परंतु तो दुखापतीतून संघर्ष करत आहे. त्याला बॅट पकडायला जमत नाही. आम्ही तो बरा होण्याची वाट पाहतोय.'' स्टॉयनिसने पहिल्या तीन सामन्यांत समाधानकारक कामगिरी केली. त्याने पहिल्या सामन्यात 37 धावा केल्या, तर दुसऱ्या लढतीत नाबाद 52 धावा कुटल्या. तिसऱ्या सामन्यातील विजयात स्टॉयनिसची खेळी महत्त्वाची ठरली. त्याने 26 चेंडूंत 31 धावा केल्या होत्या. त्यामुळे पाचव्या सामन्यात त्याचे संघात परतणे फायद्याचे ठरणारे होते. पण, आता ऑस्ट्रेलियाची अडचण वाढण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआॅस्ट्रेलिया