सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेतील विजयासह वनडे मालिकेतील पराभवाचा बदला घेतला आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना ब्रिस्बेनच्या मैदानात खेळवण्यात आला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना अनिर्णित राहिला आणि भारतीय संघाने पाच सामन्यांची मालिका २-१ अशी आपल्या नावे केली.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील ब्रिस्बेनच्या मैदानातील सामन्यात नाणेफेक जिंकून मिचेल मार्शनं पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला होता. भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ४.५ षटकांच्या खेळात ५२ धावा केल्या असताना खराब वातावरणामुळे खेळ थांबला. विजेच्या कडकडाटानंतर पावसाने बॅटिंग सुरु केली आणि शेवटी सामना रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली. ऑस्ट्रेलियनं संघावर २०२२ नंतर चौथी द्विपक्षीय मालिका गमावण्याची वेळ आली. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धची मालिका जिंकत टी-२० क्रिकेटमधील आपला दबदबा कायम राखला आहे. एवढेच नाही तर वनडे मालिकेतील पराभवाचीही परतफेड केली.
भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात खराब झाली होती. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर टी-२० मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्यानंतर दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावली होती. या पराभवानंतर सलग दोन विजय नोंदवत भारतीय संघाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली होती. अखेरचा सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्यामुळे भारतीय संघाने ही मालिका २-१ अशी खिशात घातली. मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या अभिषेक शर्माला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
- २०२२ नंतर ऑस्ट्रेलियाचे टी२०आय द्विपक्षीय मालिकांतील पराभव
- १-२ भारतकडून पराभव – २०२५ (घरच्या मैदानात)
- १-४ भारतकडून पराभव – २०२३ (परदेशात)
- ०-२ इंग्लंडकडून पराभव – २०२२ (घरच्या मैदानात)
- १-२ भारतकडून पराभव – २०२२ (परदेशात)