Join us

India vs Australia : भारताची नजर ‘क्लीन स्वीप’वर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरी व शेवटची लढत आज

India vs Australia 3rd T20 Update : कर्णधार विराट कोहली व शानदार फॉर्मात असलेल्या हार्दिक पांड्या यांना २०१६ ची आठवण झाली असेल. त्यावेळी वन-डे मालिका गमावल्यानंतर भारताने टी-२० मध्ये शानदार पुनरागमन करीत ऑस्ट्रेलियाचा ३-० ने पराभव केला होता. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 07:46 IST

Open in App

सिडनी : मालिका जिंकल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मंगळवारी तिसऱ्या व अखेरच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात फिटनेस समस्येमुळे  अडचणीत असलेल्या यजमान  संघाचा सफाया करण्यास प्रयत्नशील आहे. कर्णधार विराट कोहली व शानदार फॉर्मात असलेल्या हार्दिक पांड्या यांना २०१६ ची आठवण झाली असेल. त्यावेळी वन-डे मालिका गमावल्यानंतर भारताने टी-२० मध्ये शानदार पुनरागमन करीत ऑस्ट्रेलियाचा ३-० ने पराभव केला होता. पहिले दोन वन-डे गमावल्यानंतर भारताने कॅनबेरामध्ये तिसरा वन-डे जिंकत सूर गवसल्याचे सिद्ध केले. रवींद्र जडेजासारख्या अष्टपैलूच्या अनुपस्थितीत भारताने रविवारी दुसऱ्या टी-२० मध्ये सहा गड्यांनी सरशी साधत मालिकेत विजयी आघाडी घेतली. भारताने शमी व बुमराह यांच्यासारख्या अनुभवी गोलंदाजांना विश्रांती देत विशेष अनुभव नसलेल्या तीन वेगवान गोलंदाजांना संधी दिली. या तिघांना एकूण ४० सामन्यांचाही अनुभव नाही. नव्या चेंडूची जबाबदारी सांभाळणाऱ्या टी. नटराजनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार पदार्पण केले. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना त्याचा मारा खेळताना अडचण भासत होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांदरम्यान फरक केवळ मधल्या षटकातील फलंदाजी होती. प्रभारी कर्णधार मॅथ्यू वेड बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने लय गमावली. दुसऱ्या बाजूचा विचार करता भारतीय कर्णधार विराट कोहलीने पॉवर प्लेनंतर काही शानदार फटके लगावले. दुखापग्रस्त मनीष पांडेच्या स्थानी श्रेयस अय्यरचा समावेशही भारतीय संघासाठी लाभादायक ठरला. भारतासाठी कमकुवत बाजू युजवेंद्र चहलची निराशाजनक कामगिरी ठरली. पहिल्या टी-२० मध्ये रवींद्र जडेजाचा ‘कनकशन’ पर्यायाच्या रूपाने तीन बळी घेत सामनावीर ठरलेला चहल दुसऱ्या लढतीत महागडा ठरला. ऑस्ट्रेलियाला नियमित कर्णधार ॲरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर, मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स व जोश हेजलवुड यांची उणीव भासली. या पाचपैकी तीन खेळाडू पहिल्या टी-२० लढतीत खेळले होते. त्यात भारताने ११ धावांनी विजय मिळवला होता.  

उभय संघ यातून निवडणारभारत :- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अग्रवाल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, वाशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, टी. नटराजन, शार्दुल ठाकूर.ऑस्ट्रेलिया :- मॅथ्यू वेड (कर्णधार), सीन एबोट, एश्टोन एगर, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेजलवुड, मोइजेस हेनरिक्स, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डार्सी शॉर्ट , एडम जम्पा, अँड्र्यू टाय. 

४८ हजार प्रेक्षकांना परवानगी सिडनी क्रिकेट मैदानावर आज होणाऱ्या तिसऱ्या टी-२० लढतीचा आनंद लुटण्यासाठी मैदानावर ४८ हजार प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार आहे. याआधी शुक्रवारी कॅनबेरा येथे तसेच रविवारी सिडनीच्या याच मैदानावर झालेल्या दोन्ही सामन्याच्या वेळी एकूण प्रेक्षक क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला होता. संपूर्ण प्रेक्षकक्षमतेसह सामना खेळविण्याच्या निर्णयाचे आर्थिक विवंचनेत असलेल्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्वागत केले आहे. जानेवारीत पुन्हा याच मैदानावर भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसरा कसोटी सामना खेळविण्यात येणार आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघ