नवी दिल्ली : पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेतील चारपैकी एक कसोटी सामना नागपूरमध्ये रंगू शकतो. तसेच पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दिल्लीला आंतरराष्ट्रीय कसोटी यजमानपदाचा बहुमान मिळण्याचीही शक्यता आहे.
मालिकेतील अन्य दोन कसोटी सामन्यांसाठी अहमदाबाद व धर्मशाळा या स्थळांचा विचार होत आहे. नागपूरसह चेन्नईचाही कसोटी आयोजनासाठी विचार होत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या दृष्टीने भारतासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला कांगारुंविरुद्ध ४-० असे निर्भळ यश मिळवावे लागेल.
नागपूरमध्ये २०१७ मध्ये अखेरचा कसोटी सामना रंगला होता. त्यामुळे बीसीसीआय रोटेशननुसार नागपूरला भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीचे यजमानपद मिळण्याची शक्यता जास्त आहे. कोरोना महामारीनंतर भारतात आतापर्यंत एकूण आठ कसोटी सामने रंगले आहेत.