Join us  

टीम इंडियानं कोणताही नियम मोडलेला नाही, 'ते' वृत्त निराधार; 'बीसीसीआय'चा दावा

भारतीय संघाचा कोणत्याही खेळाडूने कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केलेलं नाही. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिलेले वृत्त निराधार असल्याचं भारतीय संघाच्या व्यवस्थापनानं स्पष्ट केलं आहे. 

By मोरेश्वर येरम | Published: January 02, 2021 8:41 PM

Open in App
ठळक मुद्देरोहितसह ५ खेळाडूंनी कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोपभारताच्या पाच खेळाडूंनी आयसोलेशनमध्ये जावं लागणार असल्याची चर्चा बीसीसीआयने सर्व दावे फेटाळून लावले, कुणीही नियम मोडला नसल्याचा केला दावा

मेलबर्नऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील काही खेळाडूंनी कोविड-१९ संबंधी नियमांचं उल्लंघन करुन हॉटेलबाहेर जेवण केल्याचे वृत्त भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) फेटाळून लावले आहे. 

भारतीय संघाचा कोणत्याही खेळाडूने कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केलेलं नाही. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिलेले वृत्त निराधार असल्याचं भारतीय संघाच्या व्यवस्थापनानं स्पष्ट केलं आहे. यजमान संघाला कोविड-१९ संदर्भातील सर्व नियमांची जाण आहे आणि त्यांनी कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही, असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं. 

नेमकं प्रकरण काय?मेलबर्नमध्ये नवलदीप सिंग या भारतीय चाहत्याने क्रिकेटपटू रोहित शर्मा, ऋषभ पंत, नवदीप सैनी आणि शुभमन गिल हे एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करत असतानाचा व्हिडिओ ट्विट केला होता. रेस्टॉरंटमध्ये भारतीय खेळाडूंच्या अतिशय जवळ बसल्याचा दावा या चाहत्याने केला होता. पण त्यानंतर चुकीची माहिती दिल्याबद्दल या चाहत्याने माफी देखील मागितली आहे. भारतीय खेळाडूंच्या जेवणाचे बिल दिल्यानंतर खेळाडूंनी आपली गळाभेट घेतल्याचा दावा या चाहत्याने केला होता. 

कोविडच्या नियमानुसार खेळाडूंनी हॉटेल बाहेर खाण्याची परवानगी आहे. पण त्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. "ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिलेल्या खोट्या आणि निराधार वृत्ताचं आम्ही खंडन करतो. मेलबर्नमध्ये झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर अशा खोट्या बातम्या देण्यास सुरुवात झाली आहे", असंही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं. 

भारतीय संघाने मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाला ८ विकेट्सने पराभूत केलं. त्यानंतर भारताने कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. भारतीय संघातील खेळाडूंनी रेस्टॉरंटमध्ये जाऊन नियमांचं उल्लंघन केल्याचं वृत्त सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिले होते. पण त्यात बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया किंवा भारतीय संघ व्यवस्थापनाच्या कोणत्याही अधिकृत व्यक्तीचं मत छापण्यात आलं नव्हतं. सिडनीमध्ये ७ जानेवारी तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माबीसीसीआयआॅस्ट्रेलियारिषभ पंतशुभमन गिल