India vs Australia, 3rd Test : भारत-ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ चार सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेण्याच्या निर्धारानं गुरुवारी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर उतरणार आहेत. टीम इंडियानं अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मेलबर्न कसोटी जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. त्यामुळे टीम इंडियाचे तिसऱ्या कसोटीत पारडे जड असेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. पण, टीम इंडियातील दुखापतीचे सत्र कायम आहे. लोकेश राहुलला ( KL Rahul) तिसऱ्या कसोटीत संधी मिळेल, असे वाटत असतानाच दुखापतीमुळे त्याच्या माघारीची माहिती BCCIनं दिली. टीम इंडिया दुखापतीशी संघर्ष करत असताना ऑस्ट्रेलिया संघात मात्र बदलाचे वारे आहेत. ऑस्ट्रेलियाचे दुखापतग्रस्त खेळाडू तंदुरुस्त होऊन तिसऱ्या कसोटीसाठी मैदानावर उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत.
भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा यांनी दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून आधीच माघार घेतली होती. त्यात मोहम्मद शमी, उमेश यादव आणि लोकेश राहुल यांची भर पडली. त्यामुळे टीम इंडियाची चिंता वाढली आहे. तिसऱ्या कसोटीत हनुमा विहारीच्या जागी लोकेश राहुलला संधी मिळेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती, परंतु दुखापतीमुळे त्यानं मालिकेतूनच माघार घेतली. सराव करताना डाव्या मनगटाला दुखापत झाली आणि ती बरी होण्याकरिता तीन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. उमेश यादवच्या जागी संघात कोणाला संधी मिळेल, हेही अद्याप स्पष्ट नाही. नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर आणि टी नटराजन शर्यतीत आहेत.
दुसरीकडे
डेव्हिड वॉर्नर आणि विल पुकोव्हस्की हे तंदुरुस्त झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन यानं वॉर्नर-पुकोव्हस्की ही जोडी तिसऱ्या कसोटीत मैदानावर उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत. जो बर्न्सला संघाबाहेर करण्यात आले आहे. ट्रॅव्हिस हेडला डच्चू दिला जाऊ शकतो. त्यामुळे मॅथ्यू वेड पाचव्या क्रमांकावर खेळेल.
ऑस्ट्रेलियाची Playing XI :
डेव्हिड वॉर्नर, विल पुकोव्हस्की, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लाबुशेन, मॅथ्यू वेड, टीम पेन, कॅमेरून ग्रीन, नॅथन लियॉन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड
भारताची Playing XI :
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर.