बंगलोर : हिटमॅन रोहित शर्माचे (११९) शतक आणि विराट कोहलीच्या (८९) झंझावाती अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने अखेरच्या एकदिवसीय सामन्यात आॅस्ट्रेलियावर सात गड्यांनी मात केली. आॅस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले २८७ धावांचे आव्हान भारताने २ गड्यांच्या मोबदल्यात ४७.३ षटकांत पूर्ण केले. या सामन्यासह भारताने मालिकेत २-१ अशी बाजी मारली. सामनावीर रोहित शर्मा, तर मालिकावीर म्हणून विराट कोहली यांना गौरविण्यात आले.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आॅस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या दोघांनी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. शिखर धवन जखमी झाल्यामुळे भारताच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी केली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. लोकेश राहुल १९ धावांवर बाद झाला.
लोकेश बाद झाल्यानंतर विराट आणि रोहित जोडीने आॅस्ट्रेलियन गोलंदाजांना हैराण केले. रोहित शर्माने ११० चेंडूत आपले २९ शतक झळकावले. झम्पाच्या गोलंदाजीवर रोहित बाद झाला. त्याने १२८ चेंडूत ८ चौकार व सहा षटकार मारले.
यानंतर विराटने श्रेयस अय्यरच्या साथीने भारताला विजयासमीप आणून सोडले. विराट ८९ धावांवर बाद झाला. यानंतर श्रेयस अय्यर (नाबाद ४४) व आणि मनिष पांडे (नाबाद ८) यांनी भारताला विजय मिळवून दिला. अॅगर व हेजलवूड यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
तत्पुर्वी आॅस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच याने सलग तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकली. मात्र, यावेळी त्याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने तिसºया सामन्यासाठी संघात कोणताही बदल केला नाही. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या षटकापासून भेदक मारा करत कांगारूंच्या धावगतीवर अंकुश लावला. चांगल्या फॉर्ममध्ये असलेला डेव्हिड वॉर्नर (३) व अॅरॉन फिंच (१९) यांना झटपट बाद करत भारताने सामन्यावर पकड मिळवली.
मोहम्मद शमीने वॉर्नरला बाद करत मोठा अडथळा दूर केला. त्यानंतर लगेचच एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करताना फिंच बाद झाला. आॅस्ट्रेलियाची अवस्था दोन बाद ५६ अशी झाली असताना स्मिथ आणि लाबुशेन यांनी तिसºया गड्यासाठी १२७ धावांची भागीदारी केली.
ही जोडी भारतीयांसाठी डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच जडेजाने लाबुशेनला बाद केले. त्याने ५४ धावा केल्या. यानंतर स्मिथने यष्टीरक्षक कॅरीला सोबतीला घेत संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. कॅरीने ३५ धावा केल्या. यादरम्यान स्मिथने आपले शतक पूर्ण केले.
स्मिथने शेवटच्या काही षटकांत फटकेबाजी करीत संघाला २५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. त्याने १३२ चेंडूंत १३१ धावांची खेळी केली. भारताकडून मोहम्मद शमीने ४, रवींद्र जडेजाने २, तर नवदीप सैनी आणि कुलदीप यादवने प्रत्येकी १-१ बळी घेतला.(वृत्तसंस्था)
कर्णधार कोहलीच्या ५ हजार धावा
विराट कोहलीने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडीत काढला. कर्णधार या नात्याने विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी सर्वात जलद करणारा तो पहिला कर्णधार ठरला आहे. अवघ्या ८१ धावांत विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही कामगिरी केली.
तीन वर्षांनंतर शतक
स्टीव्ह स्मिथने या सामन्यात आपले ९वे एकदिवसीय शतक झळकावले. भारताविरुद्ध त्याचे हे तिसरे शतक ठरले. नवव्या शतकासाठी त्याला तब्बल तीन वर्षे यासाठी वाट पहावी लागली. स्मिथने ८वे शतक १९ जानेवारी २०१७ रोजी पाकिस्तान विरुद्ध पर्थ येथे केले होते. या तीन वर्षांमध्ये बॉल टेम्परिंगमुळे स्मिथला एक वर्ष मैदानाबाहेर रहावे लागले होते.
धावफलक
आॅस्टेÑलिया : ५० षटकांत ९ बाद २८६ धावा डेविड वॉर्नर झे. राहुल गो. शमी ३, अॅरोन फिंच धावबाद जडेजा १९, स्टीव्ह स्मिथ १३१, मार्नस लाबुशेन झे. कोहली गो. जडेजा ५४, अॅलेक्स कॅरी झे. अय्यर गो. यादव, अस्टॉन टर्नर झे. राहुल गो. सैनी ४, अॅस्टॉन अॅगर नाबाद ११, पॅट कमीन्स त्रि. गो. शमी ०, अॅडम झंम्पा त्रि. गो. शमी, जोश हेजलवुड नाबाद १, गोलंदाजी : जसप्रीत बुमराह १०-०-३८-०, मोहम्मद शमी १०-०-६३-४, नवदीप सैनी १०-०-६५-१, कुलदीप यादव १०-०-६५-१, रवींद्र जडेजा १०-१-४४-२
भारत : ४७.३ षटकांत ३ बाद २८९ धावा रोहित शर्मा झे. स्टार्क गो. झंपा ११९, लोकश राहुल पायचीत गो. अॅगर १९, विराट कोहली त्रि. गो. हेजलवुड ८९, क्षेयस अय्यर नाबाद ४४, मनिष पांडे नाबाद ८, इतर १०, गोलंदाजी: पॅट कमीन्स ७-०-६४-०, मिशेल स्टार्क ९-०-६६-०, जोश हेजलवुड ९.३-१-५५-१, अॅस्टॉन अॅगर १०-०-३८-१, अॅडम झंम्पा १०-०-४४-१.