India vs Australia 4th test live score updates : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या चौथ्या कसोटीत धावांचा रतीब रचला जात आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८० धावा उभा केल्यानंतर भारताकडूनही चांगले उत्तर मिळतेय. रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी आतापर्यंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. रोहित शर्माने ऑसी गोलंदाज मिचेल स्टार्कला काही सुरेख फटके मारले, पूल शॉट अन् षटकार यांच्यातले प्रेम येथेही दिसले. स्टार्कचा बाऊन्सर रोहितने पूल शॉटने प्रेक्षकांमध्ये पाठवला. याच फटक्यासह त्याने मोठा विक्रमही नावावर केला.
फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर उभा केला. उस्मान ख्वाजा ( Usman Khawaja) ने विक्रमी ४२२ चेंडूंचा सामना करताना १८० धावांची मॅरेथॉन खेळी केली. त्याने स्टीव्ह स्मिथसह आधी ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. त्यानंतर कॅमेरून ग्रीनसह ( ११४) पाचव्या विकेटसाठी २०८ धावांची विक्रमी भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४८० धावांवर गुंडाळला गेला. नॅथन लाएन व टॉड मर्फी ( ४१) या जोडीने ११७ चेंडूंत ७० धावा जोडल्या. अश्विनने शेवटची विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४८० धावांत गुंडाळला. अश्विनने ९१ धावांत ६ विकेट्स घेतल्या.
रोहित व शुबमन जोडी चांगली फटकेबाजी करताना दिसतेय. १८व्या षटकात नॅथन लाएनच्या गोलंदाजीवर गिलने पुढे येऊन फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू आधी पॅडवर आदळला. त्यामुळे अपील झाले अन् ऑसींनी DRS घेतला. चेंडू प्रथम पॅडला लागल्याचे दिसले आणि इम्पॅक्टमध्ये चेंडू स्टम्प्सवर आदळताना दिसला, पण इम्पॅक्ट क्रिजपासून ३ मीटर लांब असल्याने तो नाबाद राहिला.
रोहितच्या १७००० आंतरराष्ट्रीय धावा ( सहावा भारतीय)
- सचिन तेंडूलकर ( ३४३५७)
- विराट कोहली ( २५०४७)
- राहुल द्रविड ( २४०६४)
- सौरव गांगुली ( १८४३३)
- महेंद्रसिंग धोनी ( १७०९२)
- रोहित शर्मा ( १७००९*)
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"