India vs Australia 2nd test live score updates : भारतीय संघाने आणखी एक कसोटी तीन दिवसांत जिंकली. आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. दीड तासांत या दोघांनी ९ विकेट्स घेत कांगारूंचा दुसरा डाव ११३ धावांवर गुंडाळला. त्यानंतर रोहित शर्मा व विराट कोहली यांनी चांगली फटकेबाजी करून भारताचा विजय पक्का केला आणि भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. चार सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेऊन भारताने बॉर्डर -गावस्कर ट्रॉफी स्वतःकडे राखली. भारताने सलग चौथ्यांदा ही ट्रॉफी स्वतःकडे राहून इतिहास घडवला. या ऐतिहासिक कामगिरीनंतर रोहितने जड्डूला मिठी मारली अन् चेतेश्वर पुजाराचा विजयी चौकार पाहून मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यानेही जोरदार सेलिब्रेशन केलं.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या २६३ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने २६२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ११३ धावांत गुंडाळण्यात भारताला यश आले. जडेजाने ४२ धावांत ७ विकेट्स घेतल्या. अश्विनने ५९ धावांत ३ विकेट्स मिळवले. ११५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला ६ धावांवर पहिला धक्का बसला. रोहित २० चेंडूंत ३१ धावा करून माघारी परतला. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत ( Innings) मध्ये २५ हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज तो ठरला.
टॉड मर्फीच्या गोलंदाजीवर पुढे येऊन मारण्याच्या प्रयत्नात विराट ( २०) स्टम्पिंग झाला. श्रेयस अय्यरही झटपट धावा करण्याच्या प्रयत्नात १२ धावांवर बाद झाला. केएस भरतने आक्रमक फटकेबाजी करून भारताला ६ विकेट्सने विजय मिळवून दिला. पुजारा ३१ आणि भरत २३ धावांवर नाबाद राहिले. भारताचा हा ऑस्ट्रेलियावरील १००वा आंतरराष्ट्रीय सामन्यातील विजय ठरला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"