१९ वर्षाखालील भारतीय संघानं पाकिस्तान विरुद्धच्या लढतीनं आशिया कप स्पर्धेच्या आपल्या मोहिमेला सुरुवात केली आहे. या सामन्यात सर्वांच लक्ष होतं ते IPL मधील युवा 'करोडपती' वैभव सूर्यंवशी या पोरावर. मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सच्या संघानं या १३ वर्षीय पोरावर तब्बल १ कोटी १० बोली लावून एक नवा विक्रम सेट केला. तो आयपीएलमधील सर्वात युवा क्रिकेटर ठरलाय. आशिया कप स्पर्धेत तो कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे नजरा आहेत.
मॅच आधी शेअर केली खास गोष्ट, या दिग्गज क्रिकेटरला मानतो आदर्श
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी दिलेल्या खास मुलाखतीमध्ये वैभव सूर्यवंशीनं काही खास गोष्टी शेअर केल्या. सध्याच्या घडीला मी खेळावर लक्षकेंद्रीत करत आहे. सोशल मीडिया आणि बाहेरच्या गोष्टींपासून दूर राहून आशिया कप स्पर्धेत चांगली कामगिरी करून संघाला ट्रॉफी जिंकून देण्यावर भर देत आहे, असे तो म्हणाला. १९ वर्षाखालील संघाकडून पदार्पणाचा कसोटी सामना खेळताना ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात त्याने शतकी खेळी केली होती. हा क्षण खूपच खास होता, असेही त्याने सांगितले. अशीच कामगिरी आता व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये करण्यास उत्सुक असल्याची भावना त्याने व्यक्त केली. यावेळी त्याला कुणाला आदर्श मानतोस? असा प्रश्नही विचारण्यात आला होता. यावर त्याने कॅरेबियन दिग्गज ब्रायन लाराचे नाव घेतले. त्याच्याप्रमाणे इनिंग बिल्ड करण्यासाठी प्रयत्नशील असतो, असेही तो म्हणाला.
पाकिस्तान विरुद्ध आक्रमक अंदाज दिसला, पण स्वस्तात माघारी फिरला
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात डावखुरा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी यानं आयुष म्हात्रेच्या साथीनं भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. पण व्हाइट बॉल क्रिकेटमधील पहिल्या डावात मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला. या सामन्यात प्रत्येक बॉलवर तो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करताना दिसला. पण त्याचा हा डाव फसला. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याने ९ चेंडूचा सामना करताना फक्त एक धाव काढली. अली रझा याने त्याला झेलबाद केले.