Join us

India Tour of South Africa : हार्दिक पांड्याचे टीम इंडियात परतणे अवघड; बीसीसीआयनं सोडले फर्मान, दक्षिण आफ्रिका दौऱ्यालाही मुकणार

India Tour of South Africa Hardik Pandya : न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत हार्दिकला बाकावर बसवून वेंकटेश अय्यरची निवड केली गेली आहे. वेंकटेशनं किवींविरुद्ध गोलंदाजी केलेली नाही. फलंदाजीतही त्याला पुरेशी संधी मिळालेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 16:56 IST

Open in App

India Tour of South Africa Hardik Pandya : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुमार कामगिरीनंतर हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून डच्चू दिला गेला. संपूर्ण ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत हार्दिक पांड्याची निवड हाच भारतीय चाहत्यांचा चर्चेचा विषय ठरलेला. आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात एकही षटक न फेकणाऱ्या व फलंदाजीतही फार कमाल न करू शकलेल्या हार्दिकची निवड का केली गेली, हा सवाल वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान सर्वांना पडलेला. अष्टपैलू म्हणून त्याचे संघातील स्थान जाणवलेच नाही, त्यामुळे आता बीसीसीआयनं चूक सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचं पहिलं पाऊल म्हणजे न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० व कसोटी मालिकेतून झालेली त्याची हकालपट्टी. आता त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी बीसीसीआयनं हार्दिकला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) जाऊन फिटनेस सिद्ध करण्याचे फर्मान सोडले आहे. ''त्याचे दुखापतीतून सावरणे हे विश्रांतीवर अवलंबून आहे. त्यानं लवकरच NCAमध्ये दाखल व्हावे आणि त्यानंतर त्याची फिटनेस पाहून दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी त्याचा विचार करायचा की नाही याचा निर्णय घेतला जाईल,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं InsideSport ला सांगितले.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत हार्दिकला बाकावर बसवून वेंकटेश अय्यरची निवड केली गेली आहे. वेंकटेशनं किवींविरुद्ध गोलंदाजी केलेली नाही. फलंदाजीतही त्याला पुरेशी संधी मिळालेली नाही. पण, पुढील ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचा विचार करून मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा यांनी आतापासून संघबांधणीवर भर दिला आहे. त्यामुळे वेंकटेशला ते अधिकाधिक संधी देण्याच्या पक्षात आहेत. 

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर केली जाईल. त्याआधी हार्दिकला NCA मध्ये दाखल होऊन फिटनेस सिद्ध करावी लागेल. तो तंदुरुस्त झाल्यास ११ जानेवारी २०२२पासून सुरू होणाऱ्या वन डे व ट्वेंटी-२० मालिकेसाठी त्याचा विचार केला जाईल. त्याआधी हार्दिकला विजय हजारे ट्रॉफीत न खेळण्याचा सल्ला दिला गेला आहे, परंतु हा निर्णय बीसीसीआयनं हार्दिकवर सोडला आहे. 

टॅग्स :हार्दिक पांड्याभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाबीसीसीआय
Open in App