Join us

भारताच्या स्मृती मानधनानं अव्वल स्थान गमावलं; किवी फलंदाजाची कुरघोडी

भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वन डे मालिका 3-0 अशी खिशात घातली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 14:19 IST

Open in App

भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वन डे मालिका 3-0 अशी खिशात घातली. दुखापतीमुळे स्मृती मानधनानं या मालिकेतून माघार घेतली होती. तिच्या अनुपस्थितीत प्रिया पुनियाला पदार्पणाची संधी मिळाली. या मालिकेत न खेळण्याचा फटका स्मृतीला बसला असून आयसीसीच्या महिला फलंदाजांच्या वन डे क्रमवारीत तिला अव्वल स्थान गमवावे लागले. न्यूझीलंडच्या अॅमी सॅदरवेटनं दुसऱ्या स्थानावरून अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

भारतीय महिला संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघासमोर शरणागती पत्करली, परंतु गोलंदाजांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला. पहिले दोन सामने सहज खिशात घालणाऱ्या भारतीय संघाला तिसऱ्या व अखेरच्या सामन्यात जेमतेम 146 धावा करता आल्या. हरमनप्रीत कौर आणि शिखा पांडे यांनी तळाला दमदार फलंदाजी करताना भारताला 6 बाद 71वरून समाधानकारक पल्ला गाठून दिला. 

लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या फलंदाजांचीही घसरगुंडी झाली होती, परंतु कर्णधार सून लूस आणि मॅरिझन्ने कॅप यांनी डाव सावरला. पण, भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना 6 धावांनी विजय मिळवून दिला. भारतानं ही मालिका 3-0 अशी सहज खिशात घातली. भारताने प्रथमच दक्षिण आफ्रिकेवर व्हाईटवॉश मिळवला.

या मालिकेतून स्मृतीनं माघार घेतली होती. त्यामुळे तिची 755 गुणांसह दुसऱ्या स्थानी घसरण झाली. सॅमी 759 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. कर्णधार मिताली राज 705 गुणांसह सातव्या स्थानी कायम आहे. 

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघमिताली राजआयसीसी