India Playing XI : भारतीय संघाला आशिया चषक सुपर ४ मध्ये बांगलादेशविरुद्ध थोडक्यात पराभव पत्करावा लागला. आता भारताला फायनलमध्ये यजमान श्रीलंकेचा सामना करायचा आहे. बांगलादेशविरुद्ध टीम इंडियात ५ बदल पाहायला मिळाले होते. विराट कोहली, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती दिली गेली होती. ते फायनलमध्ये परतणार हे निश्चित आहे. श्रेयस अय्यर याच्या खेळण्यावर अजूनही संभ्रम आहे आणि त्यात अक्षर पटेलच्या दुखापतीची भर पडलीय. बांगलादेशच्या खेळाडूने फेकलेला चेंडू अक्षरच्या मनगटावर जोरात आदळला होता. त्यामुळे आता संघ व्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून वॉशिंग्टन सुंदरला बोलावले आहे.
तिलक वर्माने मागील सामन्यातून वन डे संघात पदार्पण केले, परंतु तो भोपळ्यावर बाद झाला. सूर्यकुमार यादवला मिळालेल्या आणखी एका संधीवर पुन्हा अपयश आले. त्यामुळे टीम इंडिया उद्याच्या सामन्यात आधीच्या प्लेइंग इलेव्हनसह खेळणार हे नक्की आहे. इशान किशन चांगल्या फॉर्मात आहे, परंतु श्रेयस पूर्णपणे फिट झाल्यास त्याला संधी दिली जातेय का, याची उत्सुकता आहे. इशानला वगळल्यास संघ व्यवस्थापनाबाबत चुकीचा मॅसेज जाऊ शकतो. काल जिथे बांगलादेशविरुद्ध मॅच झाली, त्याच खेळपट्टीवर उद्या खेळायचे आहे. त्यामुळे अक्षरच्या जागी फिरकीपटूला खेळवायचे की शार्दूल ठाकूरला, हा प्रश्न असेल.