Join us

स्टेडियममधून पाकिस्तानी खेळाडूंची नावं, फोटो काढून टाकले; 'या' शहरात घेतला गेला निर्णय

India vs Pakistan Jaipur Stadium: पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाक संबंध अधिक तणावाचे झालेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 12:01 IST

Open in App

India vs Pakistan Jaipur Stadium: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये खूप तणाव दिसून आला. भारताने मोठी कारवाई केली आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत अनेक दहशतवाद्यांना ठार केले. यानंतर, पाकिस्तानने भारतावर अनेक हल्ले केले, परंतु भारतीय हवाई संरक्षण दलाने ते सर्व प्रयत्न हाणून पाडले. या काळात अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटी, क्रिकेटपटूंनी भारताविरुद्ध गरळ ओकली. त्यामुळेच जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये मोठी कारवाई करण्यात आली.

स्टेडियममधून पाकिस्तानी खेळाडूंचे फोटो हटवले...

जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियममधील 'वॉल ऑफ ग्लोरी'वरून सर्व पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो काढून टाकण्यात आले आहेत. या मैदानावर खेळलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचे फोटो सवाई मानसिंग स्टेडियममध्ये लावण्यात येतात. पाकिस्तानने येथे एक कसोटी आणि चार एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यामुळे एकूण २५ पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो 'वॉल ऑफ ग्लोरी'चा भाग होते. पण राजस्थान क्रिकेट असोसिएशनने (आरसीए) सर्व पाकिस्तानी खेळाडूंचे फोटो काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ही घटना भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट संबंधांमध्ये मोठी दरी दर्शवते.

ही पहिला वेळ नाही...

असे पाऊल उचलण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१९ मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतरही स्टेडियममधून पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो काढून टाकण्यात आले होते. या २५ खेळाडूंमध्ये पाकिस्तानकडून खेळणारा शेवटचा हिंदू क्रिकेटपटू दानिश कनेरियाचाही समावेश आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दानिश कनेरियाने पाकिस्तान सरकार आणि त्यांच्या नेत्यांवर उघडपणे टीका केली होती. यासोबतच त्यांनी पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो असा आरोपही केला होता. तरीही पाकिस्तानी संघाचा भाग असल्याने त्याचाही फोटो हटवण्यात आला.

दानिश कनेरियाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

दानिश कनेरियाने पाकिस्तानसाठी एकूण ७९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कनेरिया हा पाकिस्तानचा खास फिरकी गोलंदाज होता, ज्याने ६१ कसोटी आणि १८ एकदिवसीय सामने खेळले. या काळात त्याने कसोटी सामन्यांमध्ये ३४.७९ च्या सरासरीने २६१ विकेट्स घेतल्या. त्याच वेळी, त्याच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये १५ विकेट्स आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघात हिंदू असल्याने त्याच्याशी भेदभाव करण्यात आला होता, असे त्यानेच उघडपणे सांगितले होते.

टॅग्स :ऑफ द फिल्डपाकिस्तानपहलगाम दहशतवादी हल्लाऑपरेशन सिंदूर