दुबई : भावनिक आणि राष्ट्रीय अस्मितेचा विषय असलेला भारतपाकिस्तान हा आशिया चषकातील बहुप्रतिक्षित सामना आज रविवारी दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. खेळाडूंच्या कौशल्याचीच नव्हे तर त्यांच्या मानसिक कणखरपणाचीही कसोटी आजच्या टी-२० सामन्यात चाहते अनुभवतील. सूर्यकुमारचा बलाढ्य भारत विरुद्ध अनोळखी पाकिस्तान संघ यांच्यात ही लढत असेल.
दोन्ही संघांनी आपापल्या गटातील पहिले दोन सामने जिंकले तर ते सुपर-४ मध्ये पुन्हा एकदा भिडतील आणि जर त्यांनी अंतिम फेरी गाठली तर स्पर्धेत तिसऱ्यांदा त्यांच्यात लढत होऊ शकते. त्यामुळे, हा केवळ गटफेरीचा सामना नसून, स्पर्धेतील भविष्याची दिशा ठरवणारा ठरू शकतो.
बलस्थाने काय? कच्चे दुवे कोणते ?
भारताच्या बलाढ्य फलंदाजीपुढे पाकच्या नवख्या फिरकीपटूंचे आव्हान असेल.
फिरकीला अनुकूल खेळपट्टी असल्याने जसप्रीत बुमराह आणि शाहीन शाह आफ्रिदी हे दोनच वेगवान गोलंदाज मैदानात दिसण्याची शक्यता.
अष्टपैलू खेळाडूंचा विचार करता अनुभवी हार्दिक पांड्यापुढे पाकचा फहिम अश्रफ तुलनेने अगदीच नवखा.
पाकिस्तानी आक्रमण बेचिराख करण्याची कुवत भारतीय फलंदाजीमध्ये.
क्रिकेटवरून राजकीय नेत्यांची फटकेबाजी
मुंबई : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून राज्यात राजकीय वाक् युद्ध रंगले आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, भारतीय सैनिक सीमेवर शहीद होत असताना पाकसोबत क्रिकेट खेळणे, ही देशभक्तीची थट्टा आहे. आदित्य ठाकरे यांनी पाकिस्तानशी क्रीडा संबंध ठेवणे म्हणजे देशाशी विश्वासघात असल्याचे म्हटले आहे. तर त्यावर भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी, आदित्य ठाकरे उद्या बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान सामना पाहतील. त्यांचा आवाजही असा आहे की तो त्यांना फायदेशीर ठरेल.
भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८:०० वाजता
आमनेसामने
एकूण टी-२० सामने : १३
भारत : १०
पाकिस्तान : ३