Join us

भारत-पाक क्रिकेट सामने आठ वर्षांनंतर पुन्हा; तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळण्याची शक्यता

अद्याप बीसीसीआयकडून चर्चा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 09:24 IST

Open in App

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ यंदा तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे झाल्यास आठ वर्षांनंतर उभय संघ द्विपक्षीय मालिकेनिमित्त समोरासमोर येतील. दोन्ही संघांदरम्यान याआधी टी-२० व एकदिवसीय सामन्यांची मालिका डिसेंबर २०१२ मध्ये झाली होती. टी-२० मालिका बरोबरीत राहिली व त्यानंतर एकदिवसीय सामन्यांची मालिका पाकने जिंकली होती. आगामी मालिकेसाठी तयारी करण्याचे निर्देश मिळाल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) एका अधिकाऱ्याने म्हटले.

पुढच्या आठवड्यात आयोजित आयसीसी बैठकीत या मुद्द्यावर चर्चा अपेक्षित आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मात्र अद्याप यावर कुठलाही निर्णय झाला नसल्याचे सांगितले. ३० मार्च रोजी भारत आणि पाक परराष्ट्रमंत्र्यांची भेट अपेक्षित आहे. यादरम्यान द्विपक्षीय मालिकेविषयी परस्पर सहमती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भारताचे सध्याचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त आहे. ९ एप्रिलपासून भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये, तर त्यानंतर जूनमध्ये  न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अंतिम लढत खेळतील.

बीसीसीआयसोबत अद्याप चर्चा नाही

आगामी मालिका खेळली गेल्यास भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करेल, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. पीसीबी प्रमुख एहसान मनी यांनी मात्र भारत-पाक क्रिकेटबाबतचे वृत्त फेटाळून लावले. ‘बीसीसीआयने किंवा अन्य कुणीही याबाबत आमच्याशी संपर्क साधलेला नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

कोहलीने दिले होते संकेत

विशेष असे की, इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका संपल्यानंतर बोलताना भारतीय कर्णधार विराट कोहली याने यंदा टी-२० विश्वषकाआधी आम्हाला आणखी काही टी-२० मालिका खेळायच्या आहेत, असे संकेत दिले होते. भारतीय संघाचे वेळापत्रक फारच व्यस्त आहे. 

सहा दिवसांच्या ‘विंडो’ची प्रतीक्षा

पाकमधील ‘डेली जंग’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार दोन्ही देशांत यंदा मालिका होऊ शकते. पीसीबी सूत्रांचा हवाला देत त्याने लिहिले की, यासाठी किमान सहा दिवसांचा कालावधी लागेल. त्यावर काम सुरू झाले आहे.  

जुलैमध्ये आयोजन शक्य 

  • जुलैमध्ये भारताला कुठलीही मालिका खेळायची नाही. या विंडोचा वापर भारत-पाक मालिकेसाठी होऊ शकेल. ऑगस्ट महिन्यात भारताला इंग्लंड दौऱ्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. 
  • ही मालिका १४ सप्टेंबर रोजी संपणार असून, ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेसाठी भारताकडे एक महिना असेल. ही विंडोदेखील आयोजनासाठी उपयुक्त ठरू शकते.
  • भारत-पाक यांच्यात नऊ वर्षांपासून द्विपक्षीय मालिका झालेली नाही. २००७-०८ पासून  कसोटी मालिकेत दोन्ही संघ एकमेकांपुढे आले नाहीत. आयसीसी स्पर्धेतच दोन्ही संघ परस्परांविरुद्ध खेळतात. 
  • उभय संघांदरम्यान १९ मार्च २०१६ रोजी टी-२० विश्वचषकाचा सामना झाला होता. भारताने पाकला सहा गडी राखून पराभूत केले होते. २०१७ पासून आतापर्यंत दोन्ही देशांत पाच एकदिवसीय सामने खेळले गेले. 
  • सर्व सामने आयसीसी स्पर्धेचे होते. त्यांतील दोन सामने २०१७ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे, दोन सामने २०१८ च्या आशियाई चषकाचे, तर एक सामना २०१९ च्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचा होता.

दहशतवादी हल्ला आणि...

सन २००८च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकचा दौरा केलेला नाही. २०१९च्या पुलवामा हल्ल्यानंतर संबंध आणखी ताणले गेले. मात्र सध्या भारताने नेमबाजी विश्वचषकासाठी पाकिस्तानचा नेमबाज उस्मान चंद याला व्हिसा बहाल केला आहे. त्याआधी, १६ ते १८ मार्चदरम्यान दिल्लीत झालेल्या अश्वारोहण विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ भारतात आला होता.

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानभारतपाकिस्तानबीसीसीआय