IPL 2025 Resume Date: भारत-पाकिस्तान यांच्यात विकोपाला गेलेला वाद अखेर मिटला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान दोन्ही राष्ट्रांनी तात्काळ शस्त्रसंधी करण्यास तयारी दर्शवल्याची घोषणा केली. त्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडूनही अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत-पाक यांच्यातील विकोपाला पोहचलेला संघर्षावर तोडगा निघाल्याची पुष्टी केली. दोन्ही राष्ट्रांमधील तणावापूर्ण परिस्थितीमुळे स्थगित झालेल्या सेवा तसेच आयपीएल सारखी लोकप्रिय स्पर्धा पुन्हा सुरु होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पण उर्वरित मोजक्या सामन्यांचे नियोजन पुन्हा नव्याने करण्याचे एक वेगळे चॅलेंज आयोजकांसमोर असेल. पुढच्या आठवड्यात नव्याने सर्वकाही सुरु होईल, अशी अपेक्षा आहे.
८ मेला आयपीएल स्पर्धेला लागला होता ब्रेक
आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील धर्मशाला येथील मैदानात खेळवण्यात आलेला पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील ५८ वा सामना भारत-पाक यांच्यातील तणापूर्ण परिस्थितीमुळे थांबवण्याची वेळ आली होती. हा सामना रद्द झाल्यावर दुसऱ्या दिवशीच आयपीएल स्पर्धा आठवड्याभरासाठी स्थगित करण्यात आल्याची घोषणा बीसीसीआयकडून करण्यात आली होती.
टीम इंडियासाठी कायपण! किंग कोहली विचार बदलून कसोटी खेळण्यासाठी तयार होणार?
आता नव्या वेळापत्रकानुसार उर्वरित स्पर्धेचा मार्ग मोकळा
दोन्ही देशांतील तणावपूर्ण परिस्थिती निवळल्यामुळे आता आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामने पुन्हा खेळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकर बीसीसीआय नवे वेळापत्रक जाहीर करेल, अशी अपेक्षा आहे. पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यासह नव्याने लढती रंगणार का? ते लवकर स्पष्ट होईल. पुढच्या आठवड्यात गुरुवार ते शुक्रवारी ही स्पर्धा पुन्हा सुरु होईल असा दावा काही रिपोर्टसच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आयपीएल स्पर्धेतील साखळी फेरीतील १२ लढती आणि फायनलसह प्लेऑफ्समधील चार लढती अशा एकूण १७ लढती बाकी आहेत. यात पंजाब अन् दिल्ली यांच्यातील सामन्याचाही समावेश आहे.