यंदाच्या आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याने जगाचे लक्ष वेधले आहे. भारतीय कर्णधाराने टॉसपूर्वी पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केले नाही, सामना संपल्यावरही भारतीय संघ मैदानात पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करण्यास गेला नाही. याचे पडसाद सामना संपल्यानंतरपासून ते पाकिस्तान-युएईच्या दुसऱ्या सामन्यापर्यंत सुरुच होते. पाकिस्तानला हा अपमान चांगलाच जिव्हारी लागला होता. पीसीबीने मॅचच्या रेफरींवर कारवाई करण्यासाठी युएईच्या सामन्यापर्यंत ताणून धरले होते. परंतू, सामनाधिकारी पायक्राफ्ट यांनी पाकिस्तानवर लाजिरवाणी वेळ येऊ नये म्हणून पाकिस्तानी कप्तानाला हस्तांदोलन न करण्याबाबत सांगितले होते, असे समोर येत आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यावेळी टॉसपूर्वीच्या चार मिनिटांत बरेच काही घडले होते, असे वृत्त क्रिकइन्फोने दिले आहे. टॉसच्या ठीक चार मिनिटे आधी पायक्रॉफ्ट यांना बीसीसीआयचा संदेश मिळाला होता. भारत सरकारची परवानगी मिळाली होती. सरकारची परवानगी मिळाल्याबरोबरच बीसीसीआयचा संदेश घेऊन आशिया क्रिकेट काऊंसिलचे व्हेन्यू मॅनेजरनी धावत धावत पायक्रॉफ्टना गाठले आणि या सामन्यात टॉस झाल्यावर भारतीय कप्तान पाकिस्तानी कप्तानाशी हँडशेक करणार नाही, असा संदेश पोहोचविला.
वेळ कमी होता. पायक्रॉफ्ट यांच्याकडे आयसीसीला ही गोष्ट कळविण्याची वेळ नव्हती. अखेर परिस्थिती पाहून पायक्रॉफ्ट यांनी एक निर्णय घेतला. त्यांनी पाकिस्तानी कप्तान हँडशेक करण्यासाठी हात पुढे करेल व त्याच्यावर लाजिरवाणी वेळ येईल म्हणून त्यांनी सलमान अली आगाला याबाबत सूचना देण्याचे ठरविले होते. तेच त्यांनी केले. पायक्रॉफ्ट यांनी पाकिस्तानला या प्रसंगापासून वाचविण्याचा प्रयत्न केला होता. परंतू, पाकिस्तानच त्यांच्यावर उलटला होता. पायक्रॉफ्ट यांनाच काढून टाकण्याची मागणी पीसीबीने आयसीसीकडे केली होती. अखेर आयसीसीने सामनाधिकाऱ्यांची बाजू घेतली आणि पीसीबीची मागणी फेटाळून लावली होती.