नवी दिल्ली: भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील ब्रिस्बेनची तिसरी कसोटी अनिर्णीत संपली. या निकालानंतर दोन्ही संघ पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ असे बरोबरीत राहिले, विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या तर भारत तिसऱ्या स्थानावर घसरला. दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानावर विराजमान झाला.
भारताला स्वबळावर फायनलमध्ये पोहोचण्यासाठी मालिकेतील दोन्ही सामने जिंकावे लागतील. ऑस्ट्रेलियाचे चार सामने शिल्लक असून त्यापैकी तीन सामने जिंकल्यास हा संघ अव्वल संघांमध्ये येईल. दक्षिण आफ्रिका संघ पाकिस्तानविरुद्ध दोन सामने खेळणार आहे. त्यातील एक सामना जिंकण्याची त्यांना गरज असेल.
भारताने १७ सामन्यांपैकी नऊ जिंकले, सहा गमावले आणि दोन सामने अनिर्णीत राहिले. त्यामुळे ११४ गुण आहेत. संघावर दोन उणे गुणांची पेनल्टी लागली. त्यामुळे ५५.८८ टक्के गुणांसह संघ तिसऱ्या स्थानावर आला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आगामी दोन सामन्यांपैकी एक जरी गमावला तरी भारत डब्ल्यूटीसी फायनलमधून बाहेर पडेल.
टीम इंडियाचा फायनलचा मार्ग...
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका ३-१ ने जिंकल्यास ६०.५३ टक्के गुणांसह संघ पात्र ठरेल. मालिका २-१ अशी जिंकल्यास ५७.२ टक्के गुण होतील. अशावेळी ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेत १-० ने विजय मिळविणे गरजेचे असेल किंवा द. आफ्रिका संघ पाककडून ०-१ ने पराभूत व्हावा. मालिकेत २-२ अशी बरोबरीत झाल्यास ५५.२६ टक्के गुण. ऑस्ट्रेलियाचा लंकेत ०-१ असा पराभव व्हावा किंवा द. आफ्रिकेचा पाककडून ०-२ ने पराभव व्हायला हवा.
ऑस्ट्रेलियाला हवे तीन विजय
बॉर्डर गावसकर ट्रॉफी मालिकेत यजमान संघाने एक सामना जिंकला. त्यांनी १५ सामन्यांत नऊ विजय, चार पराभव आणि दोन अनिर्णीत सामन्यांसह १०६ गुण मिळविले. या संघावर दहा गुणांची पेनल्टी लागली आहे. त्यांचे ५८.८९ गुण असून भारताविरुद्ध आणखी दोन सामने शिल्लक आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलिया श्रीलंकेत दोन कसोटी सामने खेळेल. त्यांना स्वबळावर फायनल खेळण्यासाठी ६० टक्क्यांहून अधिक गुणांची गरज राहील.