India Masters vs England Masters : इंटरनॅशन मास्टर्स लीग टी-२० स्पर्धेच्या निमित्तानं मास्टर ब्लास्टर सचिन तेडुंलकरच्या बॅटिंगचा क्लास शो पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. श्रीलंका मास्टर्स विरुद्धच्या लढतीत वयाच्या पन्नाशीनंतर आपल्या भात्यातील कडक कव्हर ड्राइव्हची झलक दाखवणाऱ्या सचिन तेंडुलकरनं इंग्लंड मास्टर्स विरुद्धची आपल्या फटक्यातील खास नजराणा पेश केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इंग्लडचाच संघ, फक्त गोलंदाज बदलला सचिनचा पुन्हा दिसला अगदी तोच तोरा
नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात सचिन तेंडुलकरनं आपल्या फटकेबाजीनं पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना जुन्या जमान्यात नेलं. इंडिया मास्टर्स विरुद्ध इंग्लंड मास्टर्स यांच्यातील लढतीत सचिनच्या भात्यातून एक जबरदस्त सिक्सरही पाहायला मिळाला. हा फटका २००३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत सचिनने इंग्लंडच्या कॅडिकला मारलेल्या षटकाराची आठवण करून देणारा होता. संघ तोच फक्त गोलंदाज बदलला पण सचिनचा तोरा नाही बदलला असाच काहीसा हा सीन होता.
..अन् सचिननं त्या षटकारासह दिला २३ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा
इंग्लंड मास्टर्स विरुद्धच्या लढतीत टिम ब्रेस्नन (Tim Bresnan) घेऊन आलेल्या पाचव्या षटकात सचिन तेंडुलकरनं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक अप्रतिम षटकार मारला. त्याचा हा सिक्सर चाहत्यांना जुन्या आठवणीत घेऊन जाणारा असाच होता. जर तुम्हाला आठवत असेल तर २००३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत सचिन तेंडुलकरनं अगदी सेम टू सेम सिक्सर मारल्याचे पाहायला मिळाले होते. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात सचिननं अँड्रू कॅडिकच्या गोलंदाजीवर तो फटका खेळला होता. अनेक वर्षे उलटून गेल्यावर डी.वाय पाटील स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पुन्हा एकदा सचिनचा तेच तेवर पाहायला मिळाले.
सचिनची या स्पर्धेतील कामगिरी
इंग्लंड मास्टर्स विरुद्धच्या लढतीसह सचिन तेंडुलकरच्या इंडिया मास्टर्स संघानं या स्पर्धेत दुसऱ्या विजयाची नोंद केली. दुसऱ्या सामन्यात सचिनच्या भात्यातून २१ चेंडूत ३४ धावांची खेळी आली. या खेळीत त्याने ५ चौकार आणि एक षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. इंटरनॅशनल मास्टर्स लीग टी-२० स्पर्धेत श्रीलंका मास्टर्स विरुद्धच्या सलामी लढतीत सचिन तेंडुलकरनं पहिल्याच षटकात दोन चौकार मारत स्पर्धेत कडक सुरुवात केली होती. या सामन्यात त्याला फक्त १० धावा करता आल्या होत्या. स्पर्धा पुढे सरकेल तसे त्याच्या खेळी बहरतानाचे चित्र पाहायला मिळत आहे.