इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने २-१ अशी पिछाडी घेतली. याच पार्श्वभूमीवर इंग्लंडचा माजी क्रिकेटपूट डेविड लॉयडने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघासाठी अनलकी असल्याचा दावा केला आहे. पहिल्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहने उल्लेखनीय कामगिरी केली. परंतु, या दोन्ही सामन्यात भारताच्या पदरात निराशा पडली. तर, दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली, जो सामना भारताने जिंकला.
दरम्यान, पत्रकारांशी बोलताना डेविड लॉयड म्हणाले की, "चौथ्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवल्यास संघ व्यवस्थापन जसप्रीत बुमराहला पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात संधी देण्याचा विचार करेल. आधीच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी बुमराह या मालिकेत फक्त तीन सामने खेळणार असल्याचे स्पष्ट केले. या मालिकेतील दोन सामने शिल्लक आहेत आणि बुमराहने दोन सामने खेळले आहेत. बुमराहने चौथ्या कसोटीत खेळले पाहिजे. त्याच्यात भारताला जिंकून देण्याची क्षमता आहे. चौथ्या कसोटी सामन्यात बुमराहने चांगली कामगिरी करून दाखवली तर त्याला पाचव्या सामन्यातही संधी दिली जाईल. माझ्या मते, भारताने चौथा सामना गमावला तर, पाचव्या कसोटी बुमराह खेळणार नाही."
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने दुसरा कसोटी सामना जिंकला, असा प्रश्न डेविड लॉयड यांना विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले की, "बर्मिंघम कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांनी एकूण १६ विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहच्या तुलनेत दोन्ही युवा गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलीय. आकडेवारीनुसार, जसप्रीत जेव्हा भारताच्या प्लेईंग इलेव्हनचा भाग असतो, तेव्हा संघ जास्त सामने गमावतो. त्याच्या अनुपस्थितीत भारताने जास्त सामने जिंकले आहेत."