पाकिस्तानकडून क्रिकेट खेळलेला हिंदू क्रिकेटपटू दानिश कनेरिया हा त्याच्या हिंदू धर्म आणि भारताबाबत केलेल्या विधानांमुळे खूप चर्चेत असतो. दानिश कनेरिया हा भारताबाबत नेहमीच चांगलं बोलत असल्याने तो भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी असं करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. दरम्यान, दानिश कनेरियाने या सर्व अफवांचं खंडन केलं आहे. तसेच भारत ही माझी मातृभूमी आहे, तर पाकिस्तान ही माझी जन्मभूमी आहे. मात्र भारताचं नागरिकत्व मिळवण्याचा माझा कुठलाही विचार नाही, असे त्याने सांगितले.
दानिश कनेरिया हा पाकिस्तानकडून क्रिकेट खेळलेला केवळ दुसरा हिंदू क्रिकेटपटू आहे. त्याआधी अनिल दलपत हे पाकिस्तानकडून क्रिकेट खेळले होते. तसेच दानिश कनेरिया हा पाकिस्तानकडून कसोटी क्रिकेटमध्ये , सर्वाधिक बळी टिपणारा फिरकी गोलंदाज आहे. दरम्यान, दानिश कनेरिया हा त्याला क्रिकेट कारकिर्दीदरम्यान पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड आणि अधिकाऱ्यांकडून दिल्या गेलेल्या वागणुकीबाबत नेहमीच उघडपणे बोलत असतो.
दरम्यान, भारतीय नागरिकत्व घेण्याबाबत पसरलेल्या अफवांचं खंडन करताना एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये दानिश कनेरिया म्हणाला की, हल्लीच लोकांनी मला विचारलं की, तू भारतीमधील अंतर्गत बाबींवर बोलतोस, मात्र पाकिस्तानबाबत काही का बोलत नाही? त्यातील काही जणांनी तर मी हे सर्व भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी करत असल्याचा आरोप केला. अशा परिस्थितीत तुमच्यासमोर सत्य मांडणं आवश्यक आहे. भारताचं नागरिकत्व घेण्याचा माझा सध्यातरी कुठलाही विचार नाही आहे. मात्र भविष्यात माझ्यासारख्या कुणाची भारतीय नागरिकत्व घेण्यासाठी इच्छा झाली तर त्याच्यासाठी तिथे आधीच सीएए कायदा लागू झालेला आहे.
दानिश कनेरिया पुढे म्हणाला की, माझ्यासाठी भारत हा एक मंदिरासारखा आहे. पाकिस्तान ही माझी जन्मभूमी आहे. मात्र भारत माझी मातृभूमी आहे. मी नेहमी धर्म आणि सत्यासोबत उभा राहीन. तसेच समाजाला तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा मी नेहमीच पर्दाफाश करत राहीन, असेही त्याने सांगितले. तसेच जय श्रीराम असं लिहीत आपल्या या पोस्टचा समारोप केला.