Join us  

भारत पुन्हा पराभूत, ऑस्ट्रेलियाची विजयी आघाडी; स्मिथची शतकी खेळी

दुसरा वन-डे सामना; ऑस्ट्रेलियन ‘रन मशीन’ स्मिथचे भारताविरुद्ध वन-डेमध्ये हे पाचवे शतक आहे. त्याने मालिकेच्या सलामी लढतीत शतक झळकावल्यानंतर आज पुन्हा शतकाला गवसणी घातली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 3:42 AM

Open in App

सिडनी : ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथच्या (६४ चेंडू, १०४ धावा) शतकी खेळीच्या जोरावर धावांचा डोंगर उभार करीत दुसऱ्या वन-डेमध्ये भारताचा ५१ धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या ऑस्ट्रेलियातर्फे स्मिथच्या शतकाव्यतिरिक्त चार अर्धशतके झळकावल्या गेली. ऑस्ट्रेलियाने ४ बाद ३८९ धावांची दमदार मजल मारली. 

ऑस्ट्रेलियन ‘रन मशीन’ स्मिथचे भारताविरुद्ध वन-डेमध्ये हे पाचवे शतक आहे. त्याने मालिकेच्या सलामी लढतीत शतक झळकावल्यानंतर आज पुन्हा शतकाला गवसणी घातली. शतकवीर स्मिथ पुन्हा एकदा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. भारतासाठी ३९० धावांचे लक्ष्य कठीण ठरले. कर्णधार विराट कोहली (८९) व लोकेश राहुल (७६) यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावली असली तरी भारताचा डाव निर्धारित ५० षटकांत ९ बाद ३३८ धावांत रोखल्या गेला. शिखर धवन (३०) व मयांक अग्रवाल (२८) यांनी चांगली सुरुवात करून दिली, पण त्यांना मोठी खेळी करता आली नाही. भारताने ६.१ षटकांत ५० धावा केल्या होत्या. आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात धवन बाद झाल्यानंतर मैदानावर उतरलेल्या कोहलीने ८७ चेंडूंच्या खेळीदरम्यान काही आकर्षक फटके खेळले आणि भारताचे आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला. 

जोश हेजलवूडने कोहलीला बाद करीत ऑस्ट्रेलियाला मोठे यश मिळवून दिले. कोहलीचा मोइजेस हन्रिक्सने मिडविकेटवर शानदार झेल टिपला. लोकेश राहुलने ६६ चेडूंच्या खेळीदरम्यान ५ षटकार व ४ चौकार लगावले. गेल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा हार्दिक पांड्या मोठी खेळी करू शकला नाही. 

ऑस्ट्रेलियातर्फे पॅट कमिन्सने १० षटकात ६७ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. स्मिथच्या १०४ धावांच्या खेळीव्यतिरिक्त सलामीवीर वॉर्नरने ७७ चेंडूंमध्ये ८३ धावा केल्या तर कर्णधार अरोन फिंचने ६० धावांचे योगदान दिले. मार्नस लाबुशेन व ग्लेन मॅक्सवेल जोडीने आक्रमक खेळ करीत ऑस्ट्रेलियाला विशाल धावसंख्या उभारुन  दिली. लाबुशेनने ७० आणि बिग हिटर मॅक्सवेलने २९ चेंडूंमध्ये ४ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ६३ धावा केल्या. स्मिथने आपल्या १०४ धावांच्या खेळीदरम्यान १४ चौकार व २ षटकार लगावले तर वॉर्नरने ७ चौकार व ३ षटकार मारले. वॉर्नर श्रेयस अय्यरच्या थेट थ्रोवर धावबाद झाला. वर्षभराच्या ब्रेकनंतर गोलंदाजी करणाऱ्या हार्दिक पांड्याने स्मिथला तंबूचा मार्ग दाखविला.

वार्नरला दुखापतसिडनी : ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर रविवारी येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वन-डे सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला. स्नायूच्या दुखापतीमुळे तो मर्यादित षटकांच्या मालिकेतील उर्वरित लढतींना मुकण्याची शक्यता आहे. वॉर्नर भारताच्या डावातील चौथ्या षटकात सूर मारण्याच्या प्रयत्नात दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर त्याला मैदान सोडावे लागले. दुखापतीचे स्कॅन करण्यासाठी नजिकच्या रुग्णालयात नेण्यात आले.

शैलीत बदल करीत पांड्याने वर्षभरानंतर प्रथमच केली गोलंदाजीसिडनी : भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्याने वर्षभरापूर्वी पाठीवर झालेल्या शस्त्रक्रियेतून सावरताना रविवारी येथे दुसऱ्या वन-डेदरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथमच आंतरराष्ट्रीय पातळीवर गोलंदाजी केली. दोन दिवसांपूर्वी पहिल्या वन-डेनंतर पांड्याने म्हटले होते की, महत्त्वाच्या सामन्यात आणि योग्य वेळ येत गोलंदाजी करणार आहे.  त्याने शरीरावरील दबाव कमी करण्यासाठी गोलंदाजी शैलीमध्ये थोडा बदल केला. पांड्याने स्टीव्ह स्मिथला तंबूचा मार्ग दाखविला. भारतीय गोलंदाज धावा बहाल करीत असताना पांड्याने ४ षटकात २४ धावांच्या मोबदल्यात १ बळी घेतला.

टॅग्स :भारतआॅस्ट्रेलिया