Asia cup 2022, India vs Pakistan : भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एकामागून एक विक्रमांचा सपाटा लावला आहे. पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात पराभूत केल्यानंतर भारताने बुधवारी हाँगकाँगवर विजय मिळवला. या विजयासह भारताने आशिया चषक २०२२च्या सुपर ४ मध्ये प्रवेश केला. अफगाणिस्तान व भारत हे दोन संघ सुपर ४ मध्ये पोहोचले आहेत. भारताने या कामगिरीसह कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धक्का दिला आणि ट्वेंटी-२०तील मोठा विक्रम नावावर केला.
भारतीय संघाने ४० धावांनी हाँगकाँगवर विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवच्या २६ चेंडूंत ६८ धावा, विराट कोहलीच्या ५९ धावांच्या जोरावर १९२ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात हाँगकाँगला २० षटकांत १५२ धावाच करता आल्या. या विजयासह कॅलेडर वर्षात सर्वाधिक १८ विजयांचा विक्रम भारताने नावावर केला. भारताने यंदाच्या कॅलेंडर वर्षात २३ पैकी १८ सामने जिंकले आहेत, याआधी २०१६ मध्ये भारताने १५ विजय मिळवले होते. १८व्या विजयासह त्यांनी पाकिस्तानच्या नावावर २०१८ पासून असलेला १७ विजयांचा विक्रम मोडला.
पण, कॅलेंडर वर्षात सर्वाधिक ट्वेंटी-२० विजय मिळवण्याचा विक्रम पाकिस्तानच्याच नावावर आहे. त्यांनी २०२१मध्ये २० विजय मिळवले होते, परंतु आता भारतीय संघाला हाही विक्रम मोडण्याची संधी आहे. भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेत अजून किमान ३ सामने खेळणार आहे. त्यानंतर घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.
भारताने यंदाच्या वर्षात २३ ट्वेंटी-२० सामन्यांत वेस्ट इंडिजविरुद्ध ८ पैकी ७ विजय मिळवले. त्याशिवाय श्रीलंकेविरुद्ध ३, इंग्लंड, आयर्लंड व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी दोन, पाकिस्तान व हाँगकाँग यांच्याविरुद्ध प्रत्येकी १ विजय मिळवला आहे.