इंग्लंड दौऱ्यावर लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारताला ५ विकेटने पराभव स्वीकारावा लागला. मात्र, एजबॅस्टन स्टेडियमवर खेळला जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने उल्लेखनीय कामगिरी केली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारताने पहिल्या डावात ५८७ धावांचा डोंगर उभारला. या कामगिरीसह भारताने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात सर्वाधिक धावा करणारा भारत पहिला संघ ठरला आहे.
जून २०२२ पासून माजी क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्युलमने इंग्लंड संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली. तर, बेन स्टोक्सला कसोटी संघाचे कर्णधार करण्यात आले. दोघांनी आक्रमक क्रिकेट खेळण्याच्या कल्पनेने संघात नवा बदल घडवून आणला, ज्याला बॅझबॉल असे म्हणतात. इंग्लंड संघासाठीही ही रणनीती खूप यशस्वी ठरली. परंतु, एजबॅस्टन कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडच्या बॅझबॉलची हवा काढली. एजबॅस्टन सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघ ५८७ धावांवर सर्वबाद झाला. भारतीय संघ बॅजबॉल सुरू झाल्यापासून इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्याच्या एका डावात सर्वाधिक धावा करणारा संघ ठरला आहे. या कामगिरीसह भारताने पाकिस्तानचा खास विक्रम मोडीत काढला.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत एका डावात सर्वाधिक धावा१) भारत- ५८७ धावा (एजबॅस्टन कसोटी, वर्ष २०२५)२) पाकिस्तान- ५७९ धावा (रावळपिंडी कसोटी, वर्ष २०२२)३) पाकिस्तान- ५५६ धावा (मुल्तान कसोटी, २०२४)४) न्यूझीलंड - ५५३ धावा (नॉटिंगहॅम कसोटी, वर्ष २०२२)५) न्यूझीलंड - ४८३ धावा (वेलिंग्टन कसोटी, वर्ष २०२३)
एजबॅस्टन कसोटीत भारत मजबूत परिस्थितीतएजबॅस्टन कसोटीत भारत मजबूत परिस्थितीत दिसत आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने ७७ धावांवर तीन विकेट्स गमावल्या आहेत. भारताने जॅक क्रॉली, बेन डकेट आणि ऑली पोप यांना पव्हेलियनला पाठवले. आता तिसऱ्या दिवशी भारत कशी कामगिरी बजावतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.