Join us

भारत अंतिम फेरीत, रोमांचक सामन्यात श्रीलंकेचा पराभव 

अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला. केवळ धावाने हा सामना जिंकत भारताने अंध टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या तिरंगी मालिकेत अंतिम फेरीत धडक दिली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 21:53 IST

Open in App

पणजी : अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला. केवळ धावाने हा सामना जिंकत भारताने अंध टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या तिरंगी मालिकेत अंतिम फेरीत धडक दिली. या सामन्यात शानदार अर्धशतक झळकाविणारा सुनील रमेश हा सामनावीर ठरला. त्याने ६४ धावांची खेळी केली. गोवा क्रिकेट संघटनेच्या पर्वरी येथील मैदानावर खेळविण्यात येत असलेल्या अंध टी-२० क्रिकेट तिरंगी मालिकेतील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतीय सलामीवीरांनी ५० धावांची भागीदारी करीत भारताला चांगली सुरुवात करून दिली होती. त्यानंतर इतर फलंदाजांनीही धावगती कायम राखली. त्यामुळे भारताने २० षटकांत ५ बाद १९२ धावा केल्या. सुनील रमेशने सर्वाधिक ६४ धावा केल्या. जी. मुहूदकरने ३१ तर कर्णधार अजय रेड्डी याने नाबाद ४४ धावांची खेळी केली. डी. मलिकने ११ धावा केल्या. 

या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेने खूप चांगली सुरुवात केली; परंतु भारतीय खेळाडूंनी विशेषत: क्षेत्ररक्षकांनी श्रीलंकेच्या ४ फलंदाजांना धावचीत करीत आव्हान कायम राखले होते. श्रीलंकेच्या तळाच्या फलंदाजांनी चिवट झुंज दिली आणि श्रीलंकेला विजयाच्या जवळ आणले. खेळाच्या शेवटी ३ चेंडूंमध्ये श्रीलंकेला फक्त २ धावांची गरज होती. अशा वेळी भारतीय कर्णधार अजय रेड्डीने उत्कृष्ट गोलंदाजी करत श्रीलंकेच्या फलंदाजांना धावांपासून रोखले आणि भारताला हा सामना जिंकून देण्यास मदत केली. या विजयानंतर भारताचा अंतिम सामना शनिवारी (दि. १३) खेळविण्यात येणार आहे. 

संक्षिप्त धावफलक : भारत २० षटकांत ५ बाद १९२. सुनील रमेश ६४, अजय रेड्डी नाबाद ४४. गोलंदाजी : समन थुशारा ३०/२. श्रीलंका २० षटकांत ९ बाद १९१. प्रियंथा कुमारा ४३, पाथूम समन कुमारा ३६. गोलंदाजी दीपक १६/१. सामनावीर-सुनील रमेश. 

टॅग्स :भारतश्रीलंका