Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतानं 53 धावांनी न्यूझीलंडवर पहिल्यांदाच केली मात, नेहराला विजयी निरोप

नवी दिल्ली - सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या झंझावाती फलंदाजीनंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारतानं न्यूझीलंडचा 53 धावांनी पराभव करत आशिष नेहराला विजयी निरोप दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 22:33 IST

Open in App

नवी दिल्ली - सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या झंझावाती फलंदाजीनंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारतानं न्यूझीलंडचा 53 धावांनी पराभव करत आशिष नेहराला विजयी निरोप दिला. आशिष नेहरानं आज आपल्या 18 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला रामराम ठोकला.भारताचा हा न्यूझीलंडविरोधातील पहिलाच विजय आहे. यापूर्वी झालेल्या पाच सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा पराभव केला होता. फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनच्या काहीसा अंगलट आला. भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई करत सामन्यावर कब्जा मिळवला. रोहित-धवनची 158 धावांची शतकी भागीदारी आणि विराट कोहली-महेंद्रसिंह धोनीने अखेरच्या षटकात केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडसमोर 203 धावांचे आव्हान दिले होते. भारताकडून शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी प्रत्येकी 80 धावांची खेळी केली होती. तर विराट कोहलीनं 11 चेंडूत 26 धावांची तुफानी फलंदाजी केली. इश सोधी आणि ट्रेंट बोल्ट यांनी अनुक्रमे 2 आणि 1 बळी घेत भारताच्या 3 फलंदाजांना माघारी धाडलं.भारतानं दिलेल्या 203 धावांच्या आव्हानापुढे न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली. टॉम लेथम आणि कर्णधार विल्यमसनचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला फारशी चमक दाखवता आली नाही. भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना संधी दिली नाही. भारताकडून चहल, बुमराह, नेहरा आणि भुवनेश्वरनं दमदार गोलंदाजी केली.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघन्यूझीलंड