Join us

India vs England Final: १९ वर्षांखालील महिला संघाला इतिहास रचण्याची संधी; उद्या होणार भारत विरुद्ध इंग्लंडचा अंतिम सामना

India vs England Final: भारतीय महिला संघासाठी उद्याचा (२९ जानेवारी) दिवस खूप खास असणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 14:33 IST

Open in App

दक्षिण आफ्रिकेत सुरु १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने (Under 19 Womens Cricket Team) शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली फायनलमध्ये धडक दिली आहे. दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रुम येथे झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंड संघाला मात देत फायनल गाठली आहे. 

सामन्यात आधी उत्कृष्ट गोलंदाजी करुन न्यूझीलंडला १०७ धावांत रोखून भारताने श्वेता शेहरावत हिच्या नाबाद ६१ धावांच्या मदतीने सामन्यात विजय मिळवला आहे. उपांत्य फेरीतील दुसरा सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला. दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. त्यामुळे रविवारी भारत विरूद्ध इंग्लंड असा फायनलचा सामना होणार आहे. 

भारतीय महिला संघासाठी उद्याचा (२९ जानेवारी) दिवस खूप खास असणार आहे. या दिवशी, शेफाली वर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडे इतिहास रचण्याची आणि त्यांच्या देशासाठी वर्षातील पहिला विश्वचषक जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. हा विजेतेपदाचा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५.१५ वाजता पॉचेफस्ट्रूम येथील सेनवेस पार्क येथे खेळवला जाईल.

दरम्यान, १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाची कामगिरी चांगली झाली आहे. भारताचा संघ ड गटात होता. यादरम्यान टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आणि स्कॉटलंडचा पराभव केला. यानंतर सुपर सिक्सच्या पहिल्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत श्रीलंकेचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. ज्यानंतर आता सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला मात देत थेट फायनल गाठली आहे.

विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाची कामगिरी

खेळलेले सामने: ६जिंकले: ५पराभूत: १

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघआयसीसीबीसीसीआय
Open in App