संजू सॅमसनच्या ( Sanju Samson) नेतृत्वाखाली भारत अ संघाने न्यूझीलंड अ विरुद्धची वन डे मालिका आधिक २-० अशी जिंकली आहे. त्यात आज सुरू असलेल्या तिसऱ्या वन डे सामन्यात भारत अ संघाने २८४ धावा केल्या आहेत. शार्दूल ठाकूर, संजू व तिलक वर्मा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारत अ संघाने ही मजल मारली. शार्दूलने अखेरच्या ५ षटकांत दमदार फटकेबाजी करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला.
अभिमन्यू इस्वरन व राहुल त्रिपाठी यांनी पहिल्या विकेटसाठी ५५ धावा जोडल्या. राहुल २५ चेंडूंत १८ धावा करून माघारी परतला. त्यानंतर १० धावांची भर घालून अभिमन्यू बाद झाला. त्याने ३५ चेंडूंत ८ चौकारांसह ३९ धावा केल्या. कर्णधार संजू व तिलक यांनी डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. तिलक ६२ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ५० धावांवर बाद झाला. श्रीकर भरत ( ९), राजा बावा ( ४), राहुल चहर ( १) हे स्वस्तात बाद झाले. पण, संजूने ६८ चेंडूंत १ चौकार व २ षटकार खेचून ५४ धावांची खेळी केली.