भारतीय महिला क्रिकेट संघाची नंबर १ जोडी स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी आपले नाव कोरले. श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात या जोडीने केवळ भारताला विजय मिळवून दिला नाही, तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३००० पेक्षा जास्त धावांची भागीदारी करणारी जगातील पहिली जोडी ठरली आहे.
थिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले. स्मृती मानधना (८० धावा) आणि शफाली वर्मा (७९ धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या १५.२ षटकांत १६२ धावांची जबरदस्त सलामी दिली. ही भारतासाठी कोणत्याही विकेटसाठी केलेली सर्वोच्च भागीदारी ठरली. या खेळीदरम्यान या जोडीने ३ हजारांहून अधिक धावांची भागिदारी रचली. या जोडीच्या नावावर एकूण ३१०७ धावा आहेत. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिली आणि बेथ मुनी २,७२० धावा यांच्या नावावर होता.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 'टॉप' जोड्या
| जोडी (देश) | एकूण धावा |
| १. स्मृती मानधना आणि शफाली वर्मा (भारत) | ३,१०७ |
| २. एलिसा हिली आणि बेथ मुनी (ऑस्ट्रेलिया) | २,७२० |
| ३. ईशा ओझा आणि तीर्था सतीश (UAE) | २,५७९ |
| ४. सुझी बेट्स आणि सोफी डेव्हाईन (न्यूझीलंड) | २,५५६ |
भारताची सर्वोच्च धावसंख्या
या वादळी सलामीच्या जोरावर भारताने २० षटकांत २ बाद २२१ धावांचा डोंगर गाठला, जी भारतीय महिला संघाची टी-२० मधील सर्वोच्च धावसंख्या आहे. शेवटच्या षटकांत रिचा घोषने अवघ्या १६ चेंडूत नाबाद ४० धावांची आतषबाजी केली. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ १९१ धावांपर्यंतच पोहोचू शकला आणि भारताने हा सामना ३० धावांनी जिंकून मालिकेत ४-० अशी विजयी आघाडी घेतली.