IND W vs SL W India Complete 5-0 Whitewash With 15 Run Victory : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने घरच्या मैदानातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत श्रीलंकेचा अक्षरश: धुव्वा उडवला. तिरुवनंतपुरमच्या मैदानात रंगलेल्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात १५ धावांनी विजय नोंदवत टीम इंडियाने पाहुण्या श्रीलंकेला ५-० अशी क्लीन स्वीप दिली. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय महिला संगाने तिसऱ्यांदा प्रतिस्पर्धी संघाला व्हाइट वॉश दिला. याआधी२०१९ मध्ये वेस्ट इंडिज आणि २०२४ मध्ये बांगलादेशला भारतीय महिला संगाने ५-० असा दणका दिला होता. पण घरच्या मैदानात मात्र पहिल्यांदाच भारतीय संघाने हा डाव साधला आहे. दुसरीकडे श्रीलंकेचा संघाने भारत दौऱ्यावर पहिल्यांदाच पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली अन् या मालिकेत त्यांच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हरमनप्रीत कौरचे अर्धशतक अन् अरुंधतीच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने सेट केले होते तगडे टार्गेट
पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात नाणेफेक गमावल्यावर भारतीय महिला संघावर पहिल्यांदा फलंदाजी करण्याची वेळआली. सलग तीन अर्धशतके झळकावणारी शेफाली वर्मा अवघ्या ५ धावांवर बाद झाली. स्मृती मानधनाच्याजागी पदार्पणाची संधी मिळालेल्या कमलिनी हिने १२ धावा काढून मैदान सोडले. हरलीन देओलही तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळाल्यावर १३ धावाकरून माघारी परतली. संघ अडचणीत असताना कर्णधार हमनप्रीत कौरनं ४३ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ६८ धावांची दमदार खेळी केली. अखेरच्या षटकात अरुंधती रेड्डीनं ११ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद २७ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात १७५ धावा केल्या होत्या.
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघातील दोघींची अर्धशतके, पण...
भारतीय संघाने दिलेल्या १७६ धावांचा पाठलगा करताना श्रीलंकेच्या संघाकडून सलामीवीर हसीनी परेरा ६५ (४२) आणि इमेशा दुलानी ५० (३९) दोघींनी अर्धशतके झळकावली. पण त्यांची विकेट पडल्यावर अन्य एकाही बॅटरचा भारतीय गोलंदाजीसमोर निभाव लागला नाही. दीप्ती, अरुंधती रेड्डी, स्नेह राणा, वैष्णवी शर्मा, श्री चरणी आणि अमनजोत कौर या प्रत्येकीनं १-१ विकेट घेत श्रीलंकेच्या संघाला ७ बाद १६० धावांवर रोखत भारतीय संघाला १५ धावांनी विजय मिळवून दिला.