कोलकाता : भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीपाठोपाठ वन डे मालिकाही खिशात घातली. रविवारपासून भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात ट्वेंटी-20 मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेसाठी निवडलेल्या संघात कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ट्वेंटी-20 मालिकाही जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, क्रिकेटच्या या शॉर्टेस्ट फॉरमॅटकडे कोलाकातातील क्रिकेट चाहत्यांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे.
ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धेतील गतविजेता वेस्ट इंडिज संघ भारत दौऱ्यात एक तरी मालिका विजय मिळवावा यासाठी प्रयत्नशील आहेत. मालिकेतील पहिला ट्वेंटी -20 सामना रविवारी कोलकाता येथील प्रसिद्ध इडन गार्डन स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. मात्र, या सामन्याकडे प्रेक्षकांनी पाट फिरवल्याचे बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. या सामन्याच्या मोफत तिकिटही घ्यायला कोणी उत्सुक नाही. ''आजीवन, संलग्न आणि वार्षिक सभासद असे एकूण 25000 सदस्य आहेत. त्यापैकी केवळ 8000 सदस्यांनी तिकीट कलेक्ट केली आहेत. रविवारी होणाऱ्या सामन्यात स्टेडियम पूर्णपणे भरण्याची शक्यता कमी आहे,''असे बंगाल असोसिएशनच्या सुत्रांनी सांगितले.
इडन गार्डन स्टेडियमची प्रेक्षकक्षमता 66 हजार आहे. त्यात बंगाल असोसिएशनकडून 15000 तिकीटं मोफत देण्यात येणार आहेत. दोन्ही संघात प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती या सामन्यातील अत्यल्प प्रतिसादाला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. त्यात या सामन्याच्ये तिकिटांची किंमत ही 650, 1300 आणि 1900 अशी आहे. त्यामुळेही इतके महाग तिकीट खरेदी करून कोणी येऊ इच्छित नाही. तीन तासांच्या सामन्यासाठी हे महागडे तिकीट आहे, असे एका सदस्याने सांगितले.