राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : 18 वर्षीय पृथ्वी शॉच्या कसोटी पदार्पणाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामन्यात त्याला संधी मिळाली आहे आणि तो लोकेश राहुलसह सलामीला येणार आहे. शिखर धवन आणि मुरली विजय हे अनुभवी सलामीवीर अपयशी ठरल्यामुळे मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचे पृथ्वीचे लक्ष्य आहे. त्याचा खेळ कसा होतो, याची उत्सुकता आहे. मात्र, त्याने मैदानावर पाऊल ठेवताच एक अनोखा विक्रम नावावर केला.
कसोटी संघात निवड होताच पृथ्वीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या एका आगळ्यावेगळ्या विक्रमाजवळ झेप घेतली होती. पृथ्वीने केवळ 14 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि इतका कमी अनुभव असूनही कसोटीत पदार्पण करणारा तो दुसरा खेळाडू आहे. हा विक्रम तेंडुलकरच्या नावावर आहे. तेंडुलकरने कसोटी पदार्पण केले त्यावेळी त्याच्याकडे केवळ 9 प्रथम श्रेणी सामन्यांचा अनुभव होता.
राजकोट येथे सुरू असलेल्या या सामन्यात मैदानावर उतरताच त्याने आणखी एक विक्रम नावावर केला. कसोटीत पदार्पण करणारा तो भारताचा दुसरा युवा सलामीवीर ठरला आहे. त्याने 18 वर्ष 329 दिवसांत कसोटीत पदार्पण केले. हा विक्रम विजय मेहरा यांच्या नावावर आहे. त्यांनी 17 वर्ष 265 दिवसांचे असताना पहिली कसोटी खेळली होती. 1955 मध्ये त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध हा सामना खेळला होता.